पुणे, शहर प्रतिनिधी: पुणे विमानतळावर मागील काही आठवड्यांपासून पक्ष्यांचा वाढलेला वावर ही तात्पुरती समस्या न राहता, प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर धोका बनत चालली आहे. विमान उड्डाण आणि लँडिंगच्या वेळी पक्ष्यांच्या झुंडी थेट विमानांच्या मार्गात येत असून, त्यामुळे वारंवार विमानसेवा विस्कळीत होत आहे.
हवाई दलाच्या नियंत्रणाखालील पुणे विमानतळावर सध्या ‘झोन गन’द्वारे पक्ष्यांना पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय फटाके, बर्ड चेसर, गवत कापणी, आणि गस्त अशा तात्पुरत्या उपाययोजना सुरू आहेत. मात्र, या उपायांचा परिणाम काही वेळापुरताच होत असल्याने शाश्वत उपायांची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.
विमानतळाच्या आजूबाजूला अन्नाचे उरलेले पदार्थ, मांसाचे तुकडे टाकल्याने अस्वच्छता वाढली असून, याच ठिकाणी पक्ष्यांचे थवे वारंवार दिसून येत आहेत. ही मानवी निष्काळजीपणाची बाब असून, यावर कठोर कारवाईची गरज आहे.
Shivsena-NCP Politics: चंद्रकांत पाटलांनी डाव साधला…: शरद पवार गटाचा बडा नेता गळाला लावला
पक्ष्यांच्या घिरट्यांमुळे काही दिवसांपूर्वी ३ तास विमान वाहतूक ठप्प झाली होती. एक दिल्ली-पुणे विमान तर सुरतला वळवावे लागले, कारण लँडिंग पॉइंटवर पक्ष्यांची झुंड होती. यामुळे इंधनाचा अपव्यय, वेळेचा नुकसानी, प्रवाशांचा त्रास, व विमान कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे.
झोन गनचा आवाज झाल्यावर पक्षी थोडा वेळ दूर जातात, पण पुन्हा परत येण्याची शक्यता कायम असते. त्यामुळे फक्त प्रतिक्रिया स्वरूपाच्या उपायांपेक्षा, समस्या मुळातून दूर करण्याची गरज आहे.
“पक्ष्यांच्या वावरामुळे कधी विमान वाहतुकीत अडथळे येतात. मात्र, हवाई दलाच्या उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.”
— संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे