पुणे महापालिका पुणे शहरात तृतीयपंथीयांसाठी स्मार्ट टॉयलेट्स उभारणार
आकाश ढुमे, पुणे: शहरात स्वच्छता आणि सर्वसमावेशकतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत पुणे महानगरपालिकेने आधुनिक, स्वच्छ आणि सुसज्ज अशी १५ आकांक्षित स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे या स्वच्छतागृहांमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, ही सुविधा शहरामध्ये प्रथमच उपलब्ध होणार आहे.
शहरातील प्रवेशद्वाराजवळ ५ स्मार्ट स्वच्छतागृहे प्रस्तावित असून, एकूण १५ पैकी ९ स्वच्छतागृहे एक ते दीड महिन्यात पूर्णत्वास जाणार आहेत. उर्वरित ६ स्वच्छतागृहे स्थानिकांचा विरोध आणि जागेअभावी रद्द करण्यात आली आहेत. भेकराईनगर, वाघोली, खराडी, शंकरशेठ रोड, वानवडी, घोले रोड, मात्रे ब्रिज, कोरेगाव पार्क आदी ठिकाणी ही स्वच्छतागृहे उभारली जात आहेत.
अमृताने आईच्या वाढदिवसाची खास झलक केली शेअर; दिले खास सरप्राईज, पाहा Video
आजवर तृतीयपंथीयांना पुरुष वा स्त्रियांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत असल्याने त्यांना अनेक वेळा लज्जास्पद परिस्थितीचा सामना करावा लागत होता. यामुळे आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत होत्या. याच समस्येकडे गांभीर्याने पाहत महापालिकेने १४ ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वच्छतागृहांमध्ये पुरुष, स्त्री, तृतीयपंथी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे सर्व समाज घटकांचा सन्मान राखत एक समतेचे सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र स्वागत होत असून, हे स्वच्छतागृहे केवळ एक मूलभूत सुविधा नसून, सामाजिक समावेशकतेचा नवा अध्याय ठरणार आहेत.
शुभांगी चौगुले – तृतीयपंथी
“आजवर स्वच्छतागृह वापरताना लज्जास्पद अनुभवांना सामोरे जावे लागायचे. आता पुणे महानगरपालिकेने तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून आमचा सन्मान राखला आहे. ही सुविधा आम्हाला सुरक्षितता आणि स्वीकाराची भावना देते, हा समतेचा खरा संदेश आहे.”
वैशाली मराठे- तृतीयपंथी
“पुरुष-स्त्री स्वच्छतागृहांमुळे आम्हाला नेहमीच अडचणी आणि आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागायचे. पुणे महानगरपालिकेच्या स्वतंत्र स्वच्छतागृह सुविधेमुळे आम्हाला सन्मान आणि सुरक्षितता मिळेल, हा सामाजिक समावेशकतेचा एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय आहे.”
PBKS vs MI : पंजाब किंग्जची अंतिम फेरीत धडक अन् Preity Zinta ने आनंदाने मारल्या उड्या, पहा VIDEO
चंद्रकांत राऊत – घनकचरा व्यवस्थापन कनिष्ठ अभियंता
“शहरात पाच स्मार्ट स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असून, त्यामध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. या स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल,
निखिल ढाले – कनिष्ठ अभियंता घनकचरा व्यवस्थापन
शहरात १५ आकांक्षित स्वच्छतागृहे तयार करण्यात येत असून, प्रत्येक ठिकाणी सर्वसमावेशक व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, यापैकी सहा स्वच्छतागृहे स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द करावी लागली आहेत.
सध्याची टॉयलेट व्यवस्था ठरतेय निराशाजनक
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सध्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. अनेक ठिकाणी पाण्याची सुविधाही उपलब्ध नसून नियमित स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी व वृत्तांकन होऊनही घनकचरा व्यवस्थापन विभागाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी, नागरिकांना अस्वच्छ आणि अयोग्य सुविधांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आकांक्षित स्वच्छतागृहांची घोषणा जरी स्वागतार्ह असली, तरी ती खरोखरच लोकांच्या ‘आकांक्षा’ पूर्ण करू शकतील का, हा मोठा प्रश्नच आहे.