सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/सोनाजी गाढवे : शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेचा निकाल लावण्यास आधीच विलंब केला आहे. त्यात आता १८७ विद्यार्थ्यांना ० मार्क पडल्याने विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. शुभदा बागूल या विद्यार्थिनीने १९९ प्रश्न सोडवले होते, तरीही शून्य मार्क मिळाले आहेत. विशेष म्हणजे २०२२ च्या टेट परीक्षेत १०३ मार्क मिळाले होते. आता अधिक अभ्यासपूर्ण परीक्षा देऊनही ० मार्क कसे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत पुरावे हाती लागत असून, लवकरच कोर्टात जाऊ, असा इशारा विद्यार्थी प्रतिनिधींनी दिला आहे.
टेट परीक्षेचा निकाल सोमवारी ( दि. १८ ) जाहीर झाला आहे. त्यामध्ये अनेक विद्याथ्यर्थ्यांना मागील परीक्षेवेळी जेवढे गुण मिळाले तेवढेच गुण यावेळीही मिळाले आहेत. काही विद्यार्थ्यांना सन २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेत ४२ गुण मिळाले होते. त्या विद्यार्थ्यांस या परीक्षेत १४८ गुण मिळाले आहेत. तर काही विद्याथ्यांचे गुण मागील परीक्षेपेक्षाही मोठ्या संख्येने कमी झाले आहेत. परीक्षेत त्यामुळे घोळ असल्याचा आरोप भावी शिक्षकांतून होत आहे.
टेट परीक्षा घाईघाईत घेण्यात आली होती. मात्र, परीक्षा संपून अडीच महिने झाले तरीही निकाल लागला नव्हता. त्यामुळे परीक्षेचा निकाल तात्काळ लावावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार होत होती, मात्र, परीक्षेचा निकाल लावण्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तीन महिन्यांचा कालावधी लावला. त्यामुळे या काळात बराच घोळ झाल्याचा दावा भावी शिक्षकांतून होत आहे.
आता लवकर नियुक्ती आणि समुपदेशन एकाच दिवशी पार पाडली गेली पाहिजे. त्यामुळे भावी गुरुजींना रोजगार उपलब्ध होईल. शासनाने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर गुणवत्ता यादी आणि निवड यादी जाहीर करावी. काही उमेदवारांना मार्क कमी जास्त झाली आहेत. अशी शंका आलेली आहे. याची सखोल चौकशी करूनचं अतिंम यादी जाहीर केली तर बरं होईल. प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा भावी शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
टेट परीक्षा पार पाडली यावेळी गेल्या दोन भरतीमध्ये ज्यांना मार्क कमी होते त्यांना मात्र या वेळेला दुप्पट तिप्पट पट्टीने मार्क वाढलेले दिसून येत आहेत पण ज्यांचे मार्क दोन वेळा जास्त होते त्यांना अपेक्षापेक्षा खूपच कमी मार्क मिळाल्यामुळे प्रामाणिक व अभ्यासू विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड असा असंतोष निर्माण झाला आहे. परीक्षा परिषदेच्या संदर्भात शंका उपस्थित होत आहेत.
– शुभदा बागूल, टेट परीक्षार्थी
मी २०० पैकी १९९ प्रश्न सोडवले होते. यासाठी रात्रंदिवस झटून अभ्यास केला होता. जास्त मार्क मिळवून पवित्र पोर्टलमार्फत नोकरी मिळेल, अशी आशा पल्लवित झाली होती. प्रत्यक्ष निकाल हाती आल्यानंतर धक्काच बसला.
– प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन.
परीक्षांच्या पूर्वी अनेक गुण वाढवून देऊ म्हणून एजेंट कॉल करत होते पण सढळ पुरावा मिळाला नसल्याने आम्ही शांत होतो पण आता हळूहळू हातात पुरावे लागत आहेत, लवकरच निकालावर कोर्टात जाऊ..! काही तरी गोडबंगाल आहे. मेहनत घेऊन चांगले मार्क मिळवले त्यांचे अभिनंदन…
– कांबळे संदीप, अध्यक्ष. युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना