पहिल्या तिमाहीत सर्वाधिक घरांची विक्री होणाऱ्या सर्वोच्च शहरांत पुणे तिसऱ्या स्थानी (File Photo : Construction)
पुणे : 2025 च्या पहिल्या तिमाहीत, देशभरात झालेल्या घरांच्या लाँच आणि विक्रीच्या बाबतीत पुण्याने तिसरे स्थान पटकावले आहे. भारतातील सर्वोच्च सात शहरांमध्ये घरांच्या विक्रीच्या बाबतीत पुणे, बंगळूर आणि मुंबईचे वर्चस्व कायम आहे. 2025 च्या पहिल्या तिमाहीत झालेल्या एकूण विक्रीपैकी सुमारे 66 टक्के विक्री या तीन शहरांत मिळून झाली आहे. विक्रीचा ट्रेंड दर्शवत, ही तीन शहरे देशभरातील घरांच्या विक्रीच्या त्रैमासिक आकडेवारीत आघाडीवर आहेत.
2025 च्या पहिल्या तिमाहीत नवीन प्रकल्प लाँच होण्याच्या बाबतीत त्यांचे एकत्रित योगदान सुमारे 63 टक्के आहे. पुण्याच्या हाऊसिंग मार्केटमध्ये 2025 च्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त वाढ दिसून आली. या काळात पुण्यात 13892 घरांची विक्री झाली तर 14847 घरे लाँच झाली. राष्ट्रीय हाऊसिंग मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाबतीत अंदाजे 20 टक्के योगदान पुण्याचे आहे. लाँच आणि विक्री या दोन्ही बाबतीत मागील तिमाहीच्या तुलनेत पुण्यात 5 टक्के इतकी घट झाली असली तरी समस्त भारताच्या त्रैमासिक पुरवठा आणि मागणीमध्ये 15-20 टक्के स्थिर योगदान देणाऱ्या पुण्याची भारताच्या निवासी घरांच्या क्षेत्रातील एकंदर वाढ लक्षणीय आहे.
वरिष्ठ संचालक संजय बजाज म्हणाले, ‘2025 च्या पहिल्या तिमाहीत पुण्याच्या निवासी क्षेत्राने असामान्य कामगिरी केली आहे. देशभराच्या त्रैमासिक विक्रीत पुण्याने स्थिरपणे सुमारे 20 टक्के योगदान दिले आहे. पुण्याच्या उत्तर, उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पूर्व दिशेकडील चिंचवड, ताथवडे, बाणेर, बालेवाडी, हिंजवडी, बावधन, वाकड आणि खराडीसारख्या लोकेशन्सचे पहिल्या तिमाहीत या शहरात झालेल्या एकूण विक्रीत योगदान सुमारे 80 टक्के इतके आहे. याचे कारण आहे, हिंजवडी आणि खराडीच्या जवळच्या भागात झालेला टेक क्षेत्राचा विकास, मुंबईशी असलेली उत्तम कनेक्टिव्हिटी, चाकण-तळेगाव सारखी औद्योगिक क्षेत्रे जवळ असणे आणि परीघ परिसरात मोठ्या आणि परवडण्याजोग्या जमिनींची उपलब्धता.
हाय-एंड सेगमेन्ट लाँचेसमध्ये झालेल्या वाढीमुळे, भारताच्या प्रीमियम हाऊसिंग सेक्टरमधील एक आघाडीचे शहर म्हणून पुण्याचे स्थान मजबूत झाले आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत 5 टक्के घट झाली असली तरी 2025 च्या पहिल्या तिमाहीत एकंदर 14874 घरांच्या लाँचमुळे मागील वर्षाच्या तुलनेत 2 टक्के वाढच झाली आहे.