पुण्यामध्ये सत्तर वर्षीय जेष्ठ महिलेने पोलिंग बुथची जबाबदारी सांभाळली आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे शहरातील जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर तरुण कार्यकर्ते बूथवर सक्रिय दिसून आले. मतदारांना मार्गदर्शन करणे, रांगा शिस्तबद्ध ठेवणे, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना मदत करणे, अशी जबाबदारी या तरुणांनी अत्यंत उत्साहाने पार पाडली. या पार्श्वभूमीवर एक विशेष आणि लक्षवेधी बाब समोर आली.महंमदवाडीमधील एका मतदान केंद्रावर तब्बल सत्तर वर्षांवरील ज्येष्ठ महिलांच्या चमूने संपूर्ण बूथची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. वयाच्या सत्तरीत असलेल्या या “तरुण रणरागिणी” सकाळपासून संध्याकाळपर्यंत बूथवर ठामपणे उभ्या राहून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडत होत्या. त्यांच्या उत्साहापुढे अनेक तरुण कार्यकर्तेही थक्क झाले.
हे देखील वाचा : मतदार यादीत घोळ, भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले; रोहित पवारांचे गंभीर आरोप
या ज्येष्ठ महिलांनी केवळ प्रतीकात्मक उपस्थिती न ठेवता, प्रत्यक्ष कामकाजात पुढाकार घेतला. मतदारांना योग्य माहिती देणे, गोंधळ झाल्यास शांतपणे समजावून सांगणे, प्रशासनाशी समन्वय ठेवणे, अशा जबाबदाऱ्या त्यांनी आत्मविश्वासाने पार पाडल्या. “लोकशाही ही फक्त तरुणांची मक्तेदारी नाही, तर अनुभव आणि जबाबदारी यांचीही गरज असते,” हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, पुणे महापालिका निवडणुकीत तरुण आणि ज्येष्ठ यांचा हा समन्वय महत्त्वाचा संदेश देणारा आहे. एकीकडे तरुणाईचा जोश आणि ऊर्जा, तर दुसरीकडे ज्येष्ठांचा अनुभव आणि संयम या दोहोंच्या एकत्रित सहभागामुळे मतदान केंद्रांवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अनेक मतदारांनीही या कार्यकर्त्यांचे कौतुक करत “अशा लोकांमुळेच मतदानाचा अनुभव सुलभ आणि विश्वासार्ह होतो,” अशी प्रतिक्रिया दिली.
हे देखील वाचा : मतदानाऐवजी पुणेकरांची सिंहगडावर गर्दी; लोकशाहीपेक्षा विरंगुळ्याला पसंती?
राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोप, बोगस मतदानाचे दावे आणि ईव्हीएम वाद यांचा गदारोळ असताना, बूथवर दिसलेले हे चित्र लोकशाहीचा आशावादी चेहरा दाखवणारे ठरले. विशेषतः सत्तर वर्षांच्या रणरागिणींनी बूथ चालवण्याची जबाबदारी स्वीकारणे, हे महिलांच्या सक्रिय सहभागाचे आणि लोकशाहीवरील विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत अनेक वादळे उठली असली, तरी बूथवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी आणि ज्येष्ठ महिलांनी दाखवलेली ही ऊर्जा, शिस्त आणि समर्पण हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचे चित्र या निवडणुकीत ठळकपणे समोर आले आहे.






