ऐन पालखी काळात गटाराचे पाणी रस्त्यावर ; सासवडचे राजकारण तापले (संग्रहित फोटो)
सासवड : संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सासवडला मुक्कामी होता. तसेच लाखो वारकरी सासवड बाजारपेठेत फिरत असताना नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा त्यांना चांगलाच अनुभव आला. बंदिस्त गटारातील घाण पाणी बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर आल्याने वारकऱ्यांसह स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यातूनच आता सासवडचे राजकारण चांगलेच तापले असून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत आहेत.
सासवडच्या रस्त्यातील खड्ड्यांवरून काही दिवसांपूर्वीच विरोधी शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तर टंचाई काळात पाण्याचा पुरवठा नागरिकांना करण्यात प्रशासनाला अपयश आले होते. यानंतर शिवसेना नगरसेवकांनी संपूर्ण प्रशासन डोक्यावर घेतले होते. पायी मोर्चा, तर काहींनी पोतराजाचा वेश धारण करून प्रशासनाचे पुरते वाभाडे काढले होते. प्रशासनाला काय करू आणि काय करू नये अशीच अवस्था करून सोडले होते.
नगरपालिका प्रशासनाच्या याच कारभाराचा ऐन पालखी काळात सासवडकर नागरिकांसह वारकऱ्यांनाही चांगलाच अनुभव आला आहे. एकीकडे वारकरी सासवडमध्ये बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी रस्त्यावर फिरत असताना ऐन गर्दीच्या काळात ड्रेनेजचे चेंबरमधून अत्यंत घाण मैलामिश्रित पाणी भर रस्त्यात पाहून नागरिक अक्षरशः नाक मुठीत धरून त्याच पाण्यातून वाट काढत जाताना पाहायला मिळत होते. पाण्याची टंचाई, कधी गाळ मिश्रित पाणी तसेच रस्त्यातील खड्ड्यांवरून प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या विरोधी शिवसेना नगरसेवकांना पुन्हा एकदा आयतीच संधी चालून आली आहे.
नगरपालिकेतील शिवसेना गटनेता मंदार गिरमे यांच्यासह नगरसेवक बाळासाहेब भिंताडे, प्रीतम म्हेत्रे, राजेंद्र टकले, सचिन भोंडे, शिल्पा जगताप, हेमलता इनामके तसेच अक्षयराज जगताप, मयूर जगताप, अजित चौखंडे, संदीप जगताप, अभिजित जगताप, अंकुर शिवरकर, मिलिंद इनामके आदींनी पत्रकार परिषद घेवून नगरपालिकेचा चांगलाच समाचार घेतला आहे.
ड्रेनेज लाईनसाठी 63 कोटी मंजूर
२०१९ साली ६३ कोटी रुपये ड्रेनेज लाईनसाठी मंजूर झाले आहेत. त्यातून त्याच दिवशी ३६ कोटी आले आहेत, मात्र, एवढ्या वर्षात नगरपालिकेने काहीच काम केले नाही. मध्यंतरी त्यांनी आठ दिवसात काम करणार असल्याचे सांगितले होते मग का केले नाही ? असा प्रश्न शिवसेना गटनेते मंदार गिरमे यांनी उपस्थित केला आहे. डिच हाउस गावच्या बाहेर असल्याने प्रथम गावठाण मधील ग्रेनेज लाईन करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी त्यात बदल करून अगोदर बाहेरील काम सुरु केले. मात्र, तिथेही परिस्थिती काय आहे हे सर्वाना माहिती आहे, अशा शब्दांत नगरपालिकेच्या कारभारावर आक्षेप घेतला आहे.






