संग्रहित फोटो
पुणे/गायत्री पवळे : काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि त्यासोबत मातृत्वाचं स्वरूपही झपाट्याने बदलताना दिसत आहे. एकेकाळी मुलांच्या संगोपनासाठी अनुभव, परंपरा आणि घरातील मोठ्यांचा सल्ला महत्त्वाचा मानला जायचा; मात्र आजच्या डिजिटल युगात मोबाइल, इंटरनेट आणि सोशल मीडियाने आईच्या भूमिकेलाच नवं रूप दिलं आहे. मदर्स डेच्या निमित्ताने आधुनिक मातृत्वाचा हा बदलता चेहरा विशेष चर्चेत आला आहे.
आजची आई केवळ घर सांभाळणारी नाही, तर ती करिअर, मुलांचं शिक्षण, आरोग्य, मानसिक विकास आणि स्वतःचं व्यक्तिमत्त्व यांचा समतोल साधणारी ‘मल्टिटास्किंग’ व्यक्ती बनली आहे. डिजिटल माध्यमांमुळे पालकत्वाबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. गर्भधारणेपासून बालसंगोपनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर यूट्यूब, ब्लॉग्स, पॉडकास्ट आणि सोशल मीडिया मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. कोविडनंतर ऑनलाइन शिक्षणामुळे मातांची जबाबदारी आणखी वाढली. मुलांच्या ऑनलाइन वर्गांपासून गृहपाठ, स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींचं व्यवस्थापन आईलाच करावं लागलं. त्यामुळे आधुनिक मातृत्व अधिक जागरूक आणि तंत्रज्ञानस्नेही बनल्याचं चित्र दिसून येत आहे.
डिजिटल युगाने आई-मुलांच्या नात्यातील संवादाचं स्वरूपही बदललं आहे. पूर्वी अंगाई गीत, गोष्टी आणि प्रत्यक्ष संवाद यांना महत्त्व होतं; आता व्हिडिओ कॉल, इमोजी, ऑनलाइन गेम्स आणि डिजिटल कंटेंट मुलांच्या जगाचा भाग बनले आहेत. अनेक माता मुलांशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर करताना दिसतात. काही माता स्वतः ‘मॉम ब्लॉगर’ किंवा ‘पॅरेंटिंग इन्फ्लुएंसर’ म्हणून इतर महिलांना मार्गदर्शनही करत आहेत.
मात्र या बदलत्या मातृत्वासमोर काही आव्हानेही उभी आहेत. मुलांचा वाढता स्क्रीन टाइम, सोशल मीडियाचा मानसिक परिणाम, ऑनलाइन सुरक्षेचे प्रश्न आणि डिजिटल व्यसन यामुळे पालकत्व अधिक संवेदनशील बनले आहे. मुलांना तंत्रज्ञानाशी जोडतानाच संस्कार, भावनिक जिव्हाळा आणि मानवी मूल्ये जपण्याचं मोठं आव्हान आजच्या आईसमोर आहे.
सध्याच्या काळात लहान मुलांना 5 वर्षापर्यंत तरी खेळणे, पुस्तक आईने वेळ देणे आवश्यक आहे त्यांच्या सोबत वाचणे न आणि त्यांच्यावर लहान पणी पास्तुनचा संस्कार करणे गरजेचे आहे. सध्या लहान मुलांनी आणि या जनरेशनला नाही ऐकायची सवय राहीलेली नाही त्यामुळे लहान असल्यापासून काही गोष्टींची शिस्त लावणेही गरजेचे आहे. -डॉ. आदिती आंबेकर, स्त्रीरोग तज्ञ
मार्गदर्शनामुळे अनेक मातांना आधार
तज्ज्ञांच्या मते, डिजिटल साधनांचा योग्य वापर केला तर मातृत्व अधिक सक्षम होऊ शकतं. ऑनलाइन आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सहाय्य गट आणि मानसिक आरोग्यविषयक मार्गदर्शनामुळे अनेक मातांना आधार मिळत आहे. विशेषतः काम करणाऱ्या महिलांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ आणि डिजिटल प्लॅटफॉर्मने कुटुंब व करिअर यांच्यात समतोल साधणं काही प्रमाणात सुलभ केलं आहे. आईची माया, त्याग आणि जिव्हाळा हे कधीच बदलत नाहीत; बदलतो तो केवळ काळ आणि अभिव्यक्तीचा मार्ग. डिजिटल युगातील आई आधुनिक असली, तंत्रज्ञानाशी जोडलेली असली तरी तिच्या ममतेचा गाभा आजही तितकाच उबदार आहे. म्हणूनच बदलत्या काळातही ‘आई’ हीच प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात विश्वासाची आणि भावनिक आधाराची व्यक्ती राहिली आहे.
सध्याच्या काळात लहान मुलांना वेळ देणे खूप महत्वाचे झाले आहे कारण लहान मुलांचा विकास हा लवकर होऊ लागला आहे. आणि या बदलत्या युगामध्ये लहान मुलांना सांभाळणेही कठीण जात आहे कारण अनेक माता या काम करून मुलांना सांभाळत असतात हे त्यांच्या समोरील एक आव्हान म्हणता येईल. -अर्चना वांजळे, सामान्य माता.






