सौजन्य - नवराष्ट्र टीम
कोंढरी पुलाजवळ रस्त्याला गेलेले तडे दिवसेंदिवस रुंदावत आहेत. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला संरक्षण कठडे नसल्यामुळे, वाहनचालकाचे थोडेही नियंत्रण सुटल्यास वाहन थेट पुलाखाली किंवा खोल दरीत कोसळण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पावसाळ्याच्या दिवसात ही परिस्थिती अधिकच भयावह होत असून, कधीही वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ शकते.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा या रस्त्याचे काम सुरू होते, तेव्हाच काही सामाजिक संघटनांनी रस्त्याच्या कामाच्या कनिष्ठ गुणवत्तेबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्या तक्रारींना केराची टोपली दाखवत प्रशासनाने डोळेझाक केली. आज त्याच कामाच्या निकृष्ट दर्जामुळे प्रवाशांना जीवघेण्या संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्यातील तडे भरून काढावेत. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तातडीने मजबूत ‘गार्ड रेल’ उभारावेत. कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी. सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन- चालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन स्थानिक नागरिक करत आहेत. आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देते की, पुन्हा एकदा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
” रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संरक्षण कठडे नसल्यानें रात्रीच्या वेळी प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालने आहे. प्रशासनाने मोठ्या अपघाताची वाट न पहाता त्वरीत पावले उचलावीत.” – स्थानिक वाहनचालक भोर.






