संग्रहित फोटो
पिंपरी : मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नामांकित शाफ्लेप कंपनीत आज एका भयानक दुर्घटना घडली आहे. कंपनीच्या प्लांटमध्ये अचानक झालेल्या कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेले दोन्ही कामगार तरुण होते. तर जखमींवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
गणेश उंबरे, वैभव थोरात अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा, नरसिंह पाटील अशी जखमींची नावे आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाफ्लेर इंडिया कंपनीच्या एका विशिष्ट विभागात नेहमीप्रमाणे काम सुरू होते. अचानक दुपारच्या सुमारास तिथल्या गॅस यंत्रणेतून कार्बन डायऑक्साइड गॅसची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली. . मात्र, काहीच वेळात तिथला ऑक्सिजन कमी झाला आणि कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तब्बल पाच कामगार या गॅसच्या विळख्यात आले. यातील गणेश उंबरे आणि वैभव थोरात हे दोघे जागीच बेशुद्ध पडले. शरीरात मोठ्या प्रमाणावर विषारी वायू गेल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने या दोघांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कंपनीत एकच गोंधळ उडाला. तात्काळ इमर्जन्सी अलार्म वाजवून प्लांट रिकामा करण्यात आला. कंपनी प्रशासन, एमआयडीसी सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील या तिघांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
गॅस गळती नेमकी तांत्रिक बिघाडामुळे झाली की मानवी चुकीमुळे, याचा तपास पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा विभाग करत आहेत. दरम्यान, गॅस गळती रोखण्यात यश आले असून परिसरात खबरदारीचे उपाय म्हणून इतर कंपन्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे तळेगाव एमआयडीसी परिसरातील कामगारांमध्ये भीतीचे आणि सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कंपनीत पुरेशी सुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का? गॅस गळती डिटेक्ट करणारे अलार्म वेळेवर का वाजले नाहीत? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी कामगार संघटनांकडून होत आहे. या घटनेचा पुढील सविस्तर तपास तळेगाव पोलीस करत आहेत.






