कर्जत तालुक्यात असलेल्या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कर्जत तालुक्यात यावर्षी सलग तीन चार दिवस संततधार पाऊस लागून राहण्याची पहिलीच वेळ आहे. काल कर्जत तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी धोक्याच्या पातळी खाली वाहत होती. मात्र रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आज सकाळीच उल्हास नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होती. सकाळी नऊ वाजता उल्हास नदीला पूर आला होता.
कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला आलेल्या पुराचा फटका काही भागाला बसला.त्यात मुद्रे नाना मास्तर नगर पासून पुढील भागात असलेल्या मालवाडी परिसरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचे पाणी आजुबाजूच्या लोकवस्तीत घुसले.त्याचवेळी नाना मास्तर नगर मधील नदीलगत असलेल्या भागाला पुराचा धोका निर्माण झाल्याने कर्जत नगरपरिषद कडून खबरदारी घेण्यात आली.त्याचवेळी शहरातील शनी मंदिर परिसरात देखील पुराच्या पाण्याचा फटका बसला तर बामचा मळा भागातून पुराचे पाणी पुढे येत होते.
या नदीवरील दहिवली येथील पूल पाण्याखाली गेला. त्याचा परिणाम त्या भागातील ३० हून अधिक गावात जाण्याचा संपर्क तुटला होता. नेरळ पोलिसांनी नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील पूल धोक्याच्या पातळी ओलांडून पाणी वाहत असल्याने नेरळ पोलिसांनी पुलावरून कोणीही स्टंटबाजी करू नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दुपारी चार वाजता नेरळ कळंब रस्त्यावरील पुलावरून पाणी जाण्याचे बंद झाल्याने या भागातील लोकांच्या जीवात जीव आला. या पुलामुळे कळंब रस्ता बंद करण्यात आला होता. त्याचवेळी दुसरीकडे कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या चिल्हार आणि पेज नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याने काहीकाळ चिंतेचे वातावरण कर्जत तालुक्यात निर्माण झाले होते.






