फोटो सौजन्य: Social Media
राजकीय नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु होती. शेवटी हा तिढा राज्य सरकारने सोडवला आहे. राज्यातील फडणवीस सरकारने अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.
सरकारमधील त्रिकूट म्हणजेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर देखील पालकमंत्रीपदाची जबाबदारी असणार आहे. फडणवीसांकडे गडचिरोली, शिंदेंकडे मुंबई शहर आणि ठाणे, तर अजित दादांकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद असणार आहे.
राज्यातील अनेक बड्या नेत्यांना पालकमंत्री होण्याची संधी मिळाली आहे. मात्र या सर्वात धनंजय मुंडेंना पालकमंत्रीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. तर त्यांची बहीण पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या नेत्यांना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे.
मंत्रिमंडळात मराठा आरक्षणाच्या प्रस्तावाला ‘या’ बड्या नेत्याचा होता विरोध; नारायण राणेंचा गौप्यस्फोट
पालकमंत्रिपद या शब्दातील ‘पालक’ हा शब्दच पुरेसा आहे या पदाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी. पालकमंत्रिपद एखाद्या नेत्यासाठी खूप महत्वाचे असते, कारण त्याद्वारे त्याला राज्यातील विशिष्ट विभागांची जबाबदारी मिळते, ज्यामुळे त्याचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढतो. पालकमंत्रिपद मिळाल्यावर नेत्याला त्या विभागाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची संधी मिळते, तसेच विकासकामांच्या देखरेखीसाठी आणि निधीच्या वितरणासाठी त्याला महत्त्वपूर्ण अधिकार प्राप्त होतात.