मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आज नागपूर दौऱ्यावर (Nagpur Tour) जात आहेत. पक्ष विस्ताराच्या (Party Extension) दृष्टीने ते स्थानिक नेत्यांसोबत भेट घेऊन चर्चा करणार आहेत. हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू असताना राज ठाकरे नागपुरात जात असल्याने सर्वाचे लक्ष त्यांच्या या दौऱ्याकडे लागले आहे. तसेच, ते कोणाची भेट घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या तीन महिन्यांमध्ये राज ठाकरे यांचा हा दुसरा नागपूर दौरा आहे. मागील वेळी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपविरोधात (BJP) लढणार असे सांगितले होते. या दौऱ्यात मनसे प्रमुखांच्या हस्ते नवीन शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्राचे वाटप होणार आहे. तर, स्थानिक समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना कराव्या यासंदर्भात चर्चा ही होणार आहे. तीन महिन्यापूर्वी राज ठाकरेंनी नागपुरात राज्यातल्या अस्थिर राजकीय परिस्थितीला संधी म्हणून बघा, अशी सूचना मनसैनिकांना केली होती.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने सर्वच पक्षातील नेते हे नागपुरात आहेत. त्यातच आज मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील नागपुरात दाखल होणार असल्याने या दौऱ्याला महत्त्व आले आहे. या दौऱ्यात ते कोणाची भेट घेणार? याबाबतची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदांरासह बंड केल्यापासून राज ठाकरेंसोबत जवळीक वाढवली आहे. सप्टेंबर महिन्यात राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली होती. तर एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे एकत्र आले होते.