शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम (फोटो- istockphoto)
मुंबई:आज (24 जून) राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यातील प्रमुख निर्णय म्हणजे शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची रचना केली आहे. शक्ती द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाचा वेळ १८-२० तासांवरून फक्त ८-१० तासांपर्यंत कमी होईल. १२ जिल्ह्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवून, पर्यटन, प्रादेशिक विकास आणि आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यास प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. शक्तीपीठ एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होतो आणि महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपतो. यावर आता कॉँग्रेस नेते सतेज पाटील यांनी टीका केली आहे.
शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन केले जाणार आहे. याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध होत आहे. सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत. मात्र तरीही सरकारने या महामार्गाचे भूसंपादन करण्याला मान्यता दिली आहे. यावर आता सतेज पाटील आणि राजू शेट्टी याई आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले सतेज पाटील?
शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही हे आम्ही लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून सांगत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन आवश्यकता नसताना हा महामार्ग केला जात आहे. त्यापेक्षा जिथे शक्तीपिठे आहेत तिथे सरकारने निधी द्यावा. राज्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत, त्यासाठी सरकारने निधी द्यावा.
राजू शेट्टी यांची सरकारवर टीका
राज्याचे मंत्रीमंडळ म्हणजे लुटारूंचे टोळके आहे. लुटारू टोळक्याने असा निर्णय घेतला असेल तर त्यात आश्चर्यकारक काहीच नाही. बार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. शक्तीपीठ कधीही होऊ देणार नाही. पोलिस बंदोबस्तात मोजणी केली गेली आहे. पोलिस दडपशाही करत आहेत. महामार्गासाठी जमिनी देणार नाही. गोफणी तयार करून ठेवा. सर्व्हे करायला ड्रोन येतील तेव्हा ते ड्रोन गोफणीच्या दगडाने पाडून टाका.