सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राष्टीय समाज पक्ष आयाेजित ‘युवा संघर्ष निर्धार परीषदे’च्या निमित्ताने शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. रविवारी (दि. २०) हाेणाऱ्या या परिषदेत हे तीन नेते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी सदर परिषदेविषयी पत्रकार परीषदेत माहीती दिली.
पक्षाचे अध्यक्ष जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही परीषद आयाेजित केली आहे. युवा अवस्थेत जानकर यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे राज्यात एक नवी चळवळ उभी राहीली. तसेच हे तीनही नेते सर्वसामान्य कुटुंबातील असून, ते परिषदेत युवकांना संदेश देतील. या परीषदेत अनिल पवार, विक्रम ढाेणे, दत्तकुमार खंडागळे, साैरभ हटकर, नितीन आंधळे यांचा संघर्ष युवा याेद्धा म्हणून सत्कार केला जाणार असल्याचे शेवते यांनी नमूद केले.
विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. सध्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडून कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतापद देखील देण्यात आलेलं नाही. त्यामुळे कुठंतरी विरोधकांची ताकद कमी झाल्याचं बोललं जात असतानाच विरोधकांची कमी झालेली स्पेस घेण्यासाठी महाराष्ट्रातील 3 मातब्बर नेते एकत्रित येणार आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये महायुती, महाविकास आघाडीनंतर वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रातील राजकारणात पाहायला मिळाला.
नवीन समीकरणाबाबत उत्सुकता
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासोबत परिवर्तन महाशक्ती आघाडीचा प्रयोग देखील पाहायला मिळाला. अशातच आता लोकसभा आणि विधानसभेनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन आघाडीचा प्रयोग पाहायला मिळणार आहे. ‘खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार.!’ या टॅगलाईन खाली “युवा संघर्ष निर्धार परिषद 2025” होणार आहे. या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक वेगळं समीकरण महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.