ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्...! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दांडेआडम येथून रत्नागिरीकडे प्रवासी घेऊन येणारी एसटी बस (क्रमांक MH 14 BT 2231) आणि रत्नागिरी आगारातून भावेआडमच्या दिशेने निघालेली बस (क्रमांक MH 14 BT 4459) यांच्यात शीळ येथे समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.
RATNAGIRI: चिपळूण काँग्रेसची संघटनात्मक बांधणी; नव्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी
प्राथमिक तपासात एका बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तांत्रिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दांडेआडमवरून रत्नागिरीकडे येणाऱ्या बसमध्ये सकाळच्या वेळेमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे अपघातानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत ११ विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला.
सर्व जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वांवर त्वरित उपचार सुरू केले असून, कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. किरकोळ जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
अपघाताच्या जोरदार धडकेमुळे काही विद्यार्थ्यांच्या दातांना तसेच हनुवटीला किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी जखमींची विचारपूस केली. तसेच रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या अपघातामागे नेमके तांत्रिक कारण काय होते, ब्रेक निकामी होण्यामागील कारणे कोणती होती आणि दोन्ही बसचा वेग किती होता, याचा तपास गुहागर आणि रत्नागिरी पोलिसांकडून सुरू आहे. एसटी महामंडळाच्या तांत्रिक पथकाकडूनही संबंधित बसची तपासणी केली जाणार असून, तपास अहवालानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे शीळ परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
Ratnagiri : रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण






