Municipal Elections 2026: चिपळूणमध्ये राजकीय भूकंप! निकालापूर्वीच ठाकरे गटाला धक्का, 'या' नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा
चिपळूणमध्ये समीर टाकळे यांच्या निर्णयाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे चिपळूणमधील कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक अशी टाकळे कुटुंबाची ओळख होती. मात्र आता याच निष्ठावंत कुटूंबाने पक्षाची साथ सोडल्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. चिपळूण शहर व तालुक्यामध्ये ठाकरेंची शिवसेना उभी करण्यामागे टाकळे कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख बंधू टाकळे हे याच कुटुंबातील होते. असं असताना अचानक काय झालं की, समीर टाकळे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाशी कोणताही संबंध ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले, याची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
टाकळे कुटूंबाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. टाकळे कुटूंब शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ होते. शिवसेनेत फुट पडल्यानंतर देखील त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यांनी पक्ष आणखी वाढवण्यासाठी आणि चिपळूण शहर व तालुक्यामध्ये पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काम सुरु केलं होतं. मात्र आता अचानक समीर टाकळे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
काही दिवसांपूर्वी समीर टाकळे यांच्या सुकन्या, युवती शहर संघटक डॉ. सानिका टाकळे यांनी पदासह पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे समीर टाकळे यांचा राजीनामा पक्षासाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. समीर टाकळे यांनी घेतलेल्या राजीनामाच्या निर्णयाबाबत अद्याप ठाकरे गटाने कोणतीही प्रतिक्रिया जाहीर केली नाही. तसेच ठाकरेंच्या शिवसनेचा राजीनामा दिल्यानंतर समीर टाकळे कोणत्या पक्षात प्रवेश करणार, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.






