सौजन्य - सोशल मिडीया
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवारांच्या मुलाखती व निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास आमदार रोहित पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते अविनाश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, काँग्रेसचे नेते अमित पाटील, शंकर पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बी. एस. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, माजी पंचायत समिती सभापती पतंग माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, सतीश पवार आदींसह तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तासगाव–कवठेमंकाळ मतदारसंघातील चार तसेच खानापूर मतदारसंघातील दोन जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. तब्बल पाच तास चाललेल्या या प्रक्रियेत ९२ इच्छुकांनी आपली भूमिका मांडली. मागील जिल्हा परिषद व पंचायत समितीतील बहुतांश सदस्य पुन्हा इच्छुक असल्याचे चित्र यावेळी स्पष्ट झाले. पाच जिल्हा परिषद गट खुले असल्याने इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली दिसून आली.
राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून येळावी गटातील इच्छुक विशाल व अमित पाटील हे देखील या मेळाव्यास उपस्थित होते. तालुकाध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पक्ष नेतृत्व जो उमेदवार जाहीर करेल, तो सर्वांना मान्य राहील, असा ठराव यावेळी एकमताने करण्यात आला.
एकूणच, निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक ताकद, शिस्त आणि एकजूट यांवर भर देत तासगाव तालुक्यात आपली दिशा स्पष्ट केली आहे.
हे सुद्धा वाचा : सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर; पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत
सावळज गटात उमेदवारीचा पेच
सावळज जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने येथे इच्छुकांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे अंजनी हे आमदार रोहित पाटील यांचे गाव याच गटात येत असल्यामुळे उमेदवारी निवडीबाबत पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे. तसेच सावळज व वायफळे पंचायत समिती गण सर्वसाधारणसाठी राखीव असल्याने या ठिकाणीही इच्छुकांची गर्दी असून, उमेदवार निवडताना पक्षाला तोल सांभाळावा लागणार आहे.






