वळती : ‘‘आपला प्रतिनिधी या नात्याने मी संसदेमध्ये आवाज उठवल्यानंतर बैलगाडा शर्यत पुन्हा चालू झाली, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण रोजगार हा बैलगाडा शर्यतींवर अवलंबून आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. बैलगाडा बंदी उठल्यानंतर आज या ठिकाणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान दिसून येतंय. पिकाला हमीभाव, कांदा निर्यातबंदी, दूध प्रश्न, बिबट्या प्रश्न असे अनेक विषय संसदेत मांडताना तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते,’’ असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्री क्षेत्र थापलींग खंडोबा देवाची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. यात्रेला डॉ. कोल्हे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यात्रेत सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात तळी भंडार करून खंडोबाचे दर्शन घेतले.
दरम्यान, दोन दिवस भरणाऱ्या यात्रेला टोकन पद्धतीने नवसाचे ५५० बैलगाडे पळाले. यात्रेत बैलगाडा शर्यतींना कोणतेही बक्षीस अथवा इनाम दिला जात नाही. यात्रेनिमित्त थापलींग गडाच्या सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने भाविकांना बाहेर पडताना मोठी कसरत करावी लागली. तसेच डॉ. कोल्हे यांना वाहतूक कोंडीमुळे सव्वा किलोमीटर अंतर गर्दीतुन पायी चालत थापलिंग देवस्थानकडे जावे लागले.
यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच गणेश यादव, उपसरपंच सुनिल शिंदे , डॉ. संजय भोर, गणेश म्हस्के, नामदेव रिठे, डी. एन. पवार, नवनाथ पोखरकर, बाळासाहेब गाडेकर, ज्ञानेश्वर यादव, सूर्यकांत भागवत, भरत म्हस्के, सचिन निकम आदीनी परिश्रम घेतले. यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडु नये, यासाठी पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहु थाटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता .
देवदत्त निकम यांना शभेच्छा…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांची वाढती जबाबदारी पाहता ( सर्व जनतेला उद्देशून ) जे तुमच्या सर्वांच्या मनात आहे, ती अपेक्षा पूर्ती नक्कीच होईल, अशा शुभेच्छा देताना डॉ. कोल्हे यांनी एकप्रकारे अप्रत्यक्षरित्या आंबेगावमधील आमदारकीच्याच शुभेच्छा दिल्याची भावना व्यक्त केली. या पुढील काळात बैलगाडा शर्यत जागतिक पातळीवर पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावनादेखील डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.