नीलम गोऱ्हे यांची बाजू सावरत संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला(फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटाबाबत विधान केले. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. ठाकरे गटाने नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा देखील केला आहे. यावर आता शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. संजय शिरसाट म्हणाले की, “माझ्या जिल्ह्यापुरता सांगतो. माझ्या विरोधात उमेदवार दिला. पक्षाचा एक निष्ठ असलेला कार्यकर्ता आठ दिवसांचा. आठ दिवसांच्या माणसाला तुम्ही तिकीट देता. मग तुमचे शिवसैनिक कुठे गेले होते. जे 20-25 वर्षांपासून तुमच्यासोबत काम करतायत. त्यांना तिकीट का नाकारलं? आज विचारा त्यांना तो माणसू कुठे आहे. वैजापूरमध्ये बोरनारांच्या विरोधात माणूस दिला होता. व्यापारी माणूस निवडणूक लढवली तो आता भाजपात का गेला? सिल्लोडचा उमेदवार जो भाजपत होता. निवडणुकीच्या काळात तुमच्याकडे आला, निवडणूक झाली, तो भाजपात का गेला? पैठणचा उमेदवार तो कुठे आहे? विचारा त्यांना,” असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “गडाख त्यांच्या मंत्रिमंडळात तीन-चार मंत्री झाले, त्यांना विचारा. त्यांच्या वाढदिवसाला हे जायचे. आम्ही 40 वर्ष काम केलं, पण आम्हाला वाढदिवसाला साधा फोन नाही आणि यांच्या वाढदिवसाला चार्टड घेऊन जायचे” असा आरोप संजय शिरसाट यांनी केला. “त्या बाईच्या घरावर काही महिला पाठवून मर्दानगी दाखवता का?. तुम्ही स्वत:ला मर्द समजता का?. एक महिला काय बोलली, तिच्यावर तुटून पडता. आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही खोलात गेलो, तर मुश्किल होईल, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “कॉर्पोरेशनचे व्यवहार कसे होतात? कुठल्या हॉटेलमध्ये होतात, कोण-कोण असत तोडबाजीला? या सगळ्या गोष्टी सर्वांना माहितीयत. आरोप करायला काही लागत नाही. जे सत्य आहे, ते सर्वांना मान्य करावं लागेल. आजच्या घडीला जे काय चाललय, त्यामुळे तुमचा पक्ष रसातळाला गेलाय. काल आलेला माणूस नेता होऊ शकतो, त्याला तिकीट मिळतं. पण जो शिवसैनिक तुमच्यासोबत आहे त्याला तुम्ही तिकीट देऊ शकत नाहीत” असे स्पष्ट मत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधणाऱ्या ठाकरे गटाला खडेबोल सुनावले आहे.