Panchgani News: पाचगणीत नगरसेवकाच्या घरात घोड्याचा 'मुक्काम'; पांचगणीत मोकाट जनावरांचा उच्छाद
Panchgani News: हवेचे ठिकाण आणि पर्यटकांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांचगणी शहराला सध्या मोकाट जनावरांच्या वाढत्या उपद्रवाचे ग्रहण लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवरून चालणे आणि वाहने चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. शहरात मोकाट जनावरांनी मांडलेल्या उच्छादामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून, पालिका प्रशासन मात्र डोळ्यांवर कातडे ओढून बसल्याचे चित्र आहे. प्रशासन एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा रोखठोक सवाल आता उपस्थित केला जात आहे.
वाई-पांचगणी-महाबळेश्वर हा प्रमुख पर्यटन मार्ग असो वा पांचगणी-गणेशपेठ रस्ता, सध्या या सर्वच मार्गांवर घोडे, गायी आणि गाढवांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध झुंडीने ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीचा पुरता बुरडा उडाला आहे. महामार्गावरून वेगात जाणाऱ्या वाहनांना या जनावरांमुळे अचानक ब्रेक लावावे लागत असल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे. याशिवाय मुख्य बाजारपेठ, भाजी मंडई, बस स्थानक परिसर, नाका, शॉपिंग सेंटर, महात्मा फुले शाळा आणि कॉलेज परिसर या वर्दळीच्या ठिकाणी जनावरांच्या सुळसुळाटामुळे पादचाऱ्यांना चालणेही असह्य झाले आहे.
मोकाट जनावरांचा उपद्रव आता केवळ रस्त्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर ही जनावरे थेट नागरिकांच्या घरात आणि व्यापारी गाळ्यांमध्ये घुसून दहशत निर्माण करत आहेत. अशीच एक थरारक घटना नुकतीच समोर आली. रात्रीच्या अंधारात एका मोकाट घोड्याने चक्क एका नगरसेवकाच्या घरात प्रवेश केला आणि थेट तिथेच मुक्काम ठोकला. सकाळी घरातील सदस्य उठले तेव्हा समोर घोडा उभा असल्याचे पाहून सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. घोड्याने लोकप्रतिनिधीच्या घराचाच तबेला केल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन ढिम्म हलण्यास तयार नाही. गेल्या १० ते १५ वर्षांत नगरपालिकेने मोकाट जनावरांवर कोणतीही ठोस दंडात्मक कारवाई केलेली नाही. धक्कादायक बाब अशी की, पालिकेचा अधिकृत कोंडवाडा नेमका कुठे आहे, याचा पत्ताच नाही. पालिकेकडे कोंडवाडाच अस्तित्वात नसल्याची उलटसुलट चर्चा असून, हा कोंडवाडा फक्त कागदोपत्रीच जिवंत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पर्यटनाचा दर्जा घसरवणाऱ्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या समस्येचा पालिकेने तातडीने बंदोबस्त करावा, मोकाट जनावरांना तात्काळ ताब्यात घेऊन कोंडवाड्यात डांबावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा पालिका प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.






