‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर (फोटो- सोशल मीडिया)
सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर
वाघ पुनर्स्थापना प्रकल्पाला मोठे यश
नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेला चालना
कराड: सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये वाघांची नैसर्गिक संख्या पुन्हा स्थिर करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या ‘वाघ पुनर्स्थापना प्रकल्पा’ला मोठे यश मिळाले असून, ‘सेनापती’ हा नर वाघ आणि ताडोबा येथून स्थलांतरित करण्यात आलेली ‘चंदा’ ही वाघीण एकत्रितपणे वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चांदोली वन्यजीव विभागातील आंबा वनपरिक्षेत्रात हा वावर कॅमेरा ट्रॅप आणि प्रत्यक्ष निरीक्षणातून नोंदविण्यात आला आहे.
सन २०१७ मध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव, भारतीय वन्यजीव संस्था देहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाघ पुनर्स्थापना प्रकल्प’ हाती घेण्यात आला. सन २०२७ पर्यंत सह्याद्रीमध्ये मुक्त संचार करणाऱ्या वाघांची इष्टतम संख्या स्थापन करणे व पर्यावरणीय समतोल बळकट करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
कोयनेच्या जंगलात घुमतेय ‘बाजी’ची डरकाळी! चांदोली परिसरात सेनापती-सुभेदाराचा दबदबा
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २०१७ ते २०२२ या कालावधीत ‘भक्ष्य प्राणी घनता वाढ कार्यक्रम’ यशस्वीपणे राबविण्यात आला. संशोधन अहवालानंतर दुसऱ्या टप्प्यातील ‘वाघ पुनर्स्थापना’साठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास ९ ऑक्टोबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एनटीसीएच्या चौथ्या तांत्रिक समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मंजुरीनुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्पातून एकूण ८ वाघ (३ नर व ५ मादी) सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये स्थलांतरित करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने परवानगी दिली. त्यानुसार प्रत्यक्ष स्थलांतर प्रक्रिया सुरू करण्यात आली.
वाघिणींचे झाले यशस्वी स्थलांतर
सह्याद्री व्याघ्र राखीव प्रशासनाच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे मागील तीन वर्षांपासून एसटीअार-टी १ (सेनापती), एसटीअार-टी २ आणि एसटीअार-टी ३ या तीन नर वाघांचा नैसर्गिक वावर येथे स्थिर झाला आहे. मात्र, नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेसाठी मादी वाघांची आवश्यकता असल्याने ताडोबा येथील एसटीअार-टी ४ (चंदा) आणि एसटीअार-टी ५ (तारा) या वाघिणींचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले. विशेष म्हणजे, सह्याद्रीतील मूळ नर वाघ आणि स्थलांतरित मादी वाघ यांचा एकत्र वावर होणे ही प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाची बाब होती. ती आता प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून येत आहे.
नैसर्गिक वाढ, प्रजनन होण्याची शक्यता
एसटीअार-टी १ ‘सेनापती’ हा वाघ गेल्या तीन वर्षांत सह्याद्रीमध्ये मोठा अधिवास निर्माण करून दबदबा प्रस्थापित करत आहे, तर एसटीअार-टी ४ ‘चंदा’ या वाघिणीनेही त्याच क्षेत्रात सुमारे ३५ चौ. किलोमीटर परिसरात आपला नैसर्गिक अधिवास तयार केला आहे. या नर-मादी वाघांच्या एकत्र वावरामुळे सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये लवकरच वाघांची नैसर्गिक वाढ व प्रजनन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, हा क्षण संपूर्ण प्रकल्पासाठी आशादायी व ऐतिहासिक मानला जात आहे.






