खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. आज कल्याणमध्ये ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी पत्रकार परिषद घेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. मुख्यमंत्र्यांचा मुलगा अशा प्रकारचे वक्तव्य करत असेल तर ते दुर्दैवी आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजप आणि आरएसएस त्यांच्यावर नाराज आहेत ही मते मिळवण्यासाठी ते मोदीचे स्तुती करतात असं त्यांनी सांगितले.
500 वर्षांनी युग पुरुष जन्मला ते म्हणजे नरेंद्र मोदी अशा शब्दात खासदारांनी संसदेत नरेंद्र मोदींचे कौतुक केलं होतं. या वक्तव्याचे पडसाद समाज माध्यमांवर उमटू लागले आहेत. कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी खासदार शिंदे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. बाळ हरदास यांनी संसदेत जर मुख्यमंत्र्यांचा मुलगाच पाचशे वर्षात मोदीं सारखे कुणी जन्मला नाही असं बोलत असेल तर या पाचशे वर्षात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मलेच नाही का असा सवाल केला.
ज्या बाळासाहेबांच्या विचारांवर पुढे चालतात असं ते बोलतात त्या बाळासाहेबांचा जन्म या पाचशे वर्षात नाही झाला का? असा सवाल केला. पुढे बोलताना खासदार शिंदे यांच्या विरोधात भाजप आणि आरएसएस नाराजी आहे. त्यामुळे येथे लोकसभा निवडणुकीत खासदार शिंदे यांना भाजप आरएसएस मतदान करणार नाही. त्या भीतीने ते मोदींची स्तुती करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बाळ हरदास यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेदरम्यान कांचन खरे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.