फोटो - सोशल मीडिया
बारामती : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रा तर शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. अजित पवार यांनी लोकसभा निवडणूकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभेला अजित पवार यांना बारामतीमध्ये मोठा फटका बसला. लोकसभेची निवडणूक गाजली असली तरी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. यामुळे आता विधानसभेसाठी अजित पवार विरुद्ध शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना संधी देण्य़ात आली आहे. मात्र अजित पवार यांच्या सुरामध्ये नाराजी दिसून असून ते बारामतीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहण्याची शक्यता कमी दिसून येत आहे. यावर आता शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.
मागील अनेक दिवसांपासून अजित पवार हे जनसन्मान यात्रेमधून लोकांना आणि मतदारांना भेटत आहे. मात्र बारामतीमध्ये त्यांनी उमेदवारीबाबत नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. यापूर्वी झालेल्या भाषणांमध्ये अजित पवार यांनी पिकतं तिथं उगवत नाही. बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे. बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. 1991 ते 2024 च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा, अशी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे अजित पवार हे आता बारामतीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. यावरुन माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले डॉ. सतीश पाटील ?
माध्यमांशी संवाद साधताना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी अजित पवारांबाबत मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, अजित पवार यांनी शरद पवार यांना रोखलं का? उलट बारामतीकरांनी जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता अजित दादा स्वतः म्हणत आहेत की मी बारामतीमध्ये निवडणूक लढणार नाही. बारामतीमध्ये शरद पवार साहेबांची कामगिरी आहे. त्यामुळे अजित पवार हे स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवायला घाबरत आहेत. फुटून आलेल्या आमदार 2 हजार, 3 हजार कोटींची काम सांगतात. त्या सुद्धा त्यांनी की टक्केवारी घेतलेली आहे लोक त्यांना जाब विचारत आहेत. त्यामुळे लोक यांचा हिशोब करायला निघालेले आहेत, असे विधान डॉ. सतीश पाटील यांनी केले आहे.
पुढे सतीश पाटील म्हणाले की, अनेक योजना आणून सुद्धा लोक त्याला भुलत नाहीये त्यामुळे जास्तीत जास्त निवडणूक लांबवल्या जात आहेत. पर्याय म्हणून राष्ट्रपती राजवट लागण्याची सुद्धा शंका आम्हा सर्वांना वाटते आहे. सगळे घरी जाणार आहेत, आणि विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील. महाविकास आघाडीचं सरकार येईल, असे विधान सतीश पाटील यांनी केले आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांना सुद्धा मान्य झाला आहे की महाविकास आघाडीचे सरकार येत आहेत. त्यामुळे ते जर म्हणत असतील की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. तर त्यांच्या तोंडात साखर पडू द्या. भाजपने त्यांना लटकवून ठेवलं आहे..मात्र त्यांनी दिलेला अल्टिमेटम हा संपलेला आहे, असे वक्तव्य डॉ. सतीश पाटील यांनी केले आहे.