पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (Kasba Bypoll) प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी अनेक दिग्गज नेतेमंडळी पुण्यात ठाम मांडून बसले आहेत. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्याबाबत विचारले असता त्यांनी भांडखोर आहे फार, तिला आवरावं लागतं, असं म्हटलं. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
शरद पवार यांना माध्यमांनी रूपाली ठोंबरे पाटील यांच्याबाबत एक प्रश्न विचारला होता. त्यावर शरद पवार म्हणाले, ‘कुणाविषयी बोलताय?’ त्यावर मग रुपालीताई ठोंबरे पाटील असं पत्रकाराने सांगितले. त्यानंतर शरद पवार लगेचच म्हणाले, ‘भांडखोर आहे फार. पोलीस काही बोलू लागले तर ती थेट अंगावर जाते त्यांच्या. तिला आवरावं लागतं’. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी रुपाली पाटील यांच्याबाबत विधान केल्यानंतर उपस्थित पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला पवारांनी प्रत्युत्तरही दिले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘हे भाजप प्रदेशाध्यक्षांचं विधान बालीश आणि पोरकटपणाचं आहे. इतकी वर्ष भाजप नेत्यांना ओळखतो पण त्यांना मिठीमारण्यासारखे ते नाहीत’.
रूपाली पाटील मनसेतून राष्ट्रवादीत
रूपाली पाटील यांनी डिसेंबर 2021 मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसेच्या फायरब्रँड नेत्या अशी रूपाली पाटील यांची ओळख होती. त्यांनी राज ठाकरेंना एक पत्र लिहून पक्ष सोडला. त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या.