bhagirath bhalke
पंढरपूर : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून एक महिना उलटून गेला असताना आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभ निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वासही वाढला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दिड दोन महिन्यात ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या गटातील इनकमिंगही वाढले आहे. पण यामुळे महायुतीची डोकेदुखी मात्र वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही शरद पवार यांच्या गटाने लोकसभा निवडणुकीत आठ खासदार निवडून आणले. या निकालानंतर आता शरद पवार यांच्या गटात इनकमिंग वाढू लागले आहे. विशेष म्हणजे आजच बारामतीतील गोविंद बागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी शेकडो पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात पंढरपूरचे भगीरथ भालके यांचाही समावेश होता. त्यामुळे भगीरथ भालके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू पंढपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.
भगीरथ भालके हे पंढरपूरच्या मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र आहेत. मंगळवेढा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना१ लाख ५ हजार मते मिळाली. पण त्यांचा पराभव झाल्याने ते चांगलेच नाराज होते. लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला. पण आज त्यांनी गोविंदबागेत शरद पवार यांची भेट घेतली. तेव्हापासून त्यांच्या घरवापसीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
भगीरथ भालके आणि शरद पवारांच्या भेटीमुळे पंढरपुरातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे.पण जर भगीरथ भालके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर पंढरपुरात राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या दहा वर्षांपासून भगीरथ भालके विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात काम करत आहेत. भारत भालकेंच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची भगीरथ भालके कारखान्याचे चेअरमन झाले. कारखान्याच्या सर्व १८ संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली होती.