हिंदी सक्ती, जनसुरक्षा विधेयक आणि शक्तिपीठ महामार्गावर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडून भाष्य
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी रविवारी (दि. २९) अलिबाग येथील शेतकरी भवनमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर शासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली. जनसुरक्षा विधेयक, हिंदी भाषेची सक्ती आणि शक्तीपीठ महामार्ग याविरोधात शेकापची भूमिका स्पष्ट करत त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
जयंत पाटील यांनी सांगितले की, नव्याने मंजूर करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकामुळे देशात हुकूमशाही स्थिती निर्माण होत आहे. संप करणं, शांततेत आंदोलन करणं, मोर्चा काढणं यावर बंधन येणार आहे. आंदोलन केल्यास सहा महिने जामीन नाकारला जाऊ शकतो, ही स्थिती लोकशाहीला घातक आहे. हा कायदा कामगार, सरकारी कर्मचारी, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना दडपण्यासाठी वापरला जाणार आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
शेतकरी, कामगारांनी आपल्या हक्कांसाठी केलेल्या लढ्यामुळे आज अनेक कायदे अस्तित्वात आले आहेत. मात्र आता तेच कायदे मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या कायद्याच्या विरोधात शेकापसह विविध संघटना रस्त्यावर उतरणार असून, जिल्हास्तरावर जनजागृती केली जाणार आहे. सोमवारी शेकाप या विधेयकाविरोधात आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्रैभाषिक योजनेखाली शाळांमध्ये पहिल्यापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याला विरोध करत जयंत पाटील म्हणाले, “हिंदी भाषेला विरोध नाही, पण सक्तीला विरोध आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भाषेवर गदा येईल, अशी कुठलीही योजना आम्ही मान्य करणार नाही.”
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा सल्ला न घेता हा निर्णय लादण्यात आला आहे. गुजरातसारख्या काही राज्यांना वगळून इतर ठिकाणी हिंदी सक्ती केली जात आहे, यामागे मनुवादी विचारधारा आणि छुप्या पद्धतीने संविधान बदलण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या ५ जुलैला या विरोधात डाव्या आघाडीसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
हिंदी भाषेविरोधात शिंदेंचेही मंत्री आक्रमक; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दर्शवला विरोध
शक्तिपीठ महामार्गासाठी पिकत्या जमिनी संपादित करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. यामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून, नदीकाठच्या गावांमध्ये पूराचा धोका वाढणार आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्ग सुस्थितीत असताना समांतर मार्गाची गरज नाही. हा महामार्ग म्हणजे निवडणुकीसाठी निधी गोळा करण्याचा एक भ्रष्ट मार्ग असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
सांगली जिल्ह्यात शेतकरी मोजणी रोखत असून, पोलिसी दडपशाहीचा वापर केला जात आहे. तरीही शेतकरी आपली जमीन देण्यास तयार नाहीत. या प्रकल्पाला शेकापचा तीव्र विरोध असून, राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.