मुंबई : वेदान्त-फॉक्सकॉन प्रकरणावरून राज्यात सध्या आरोप-प्रत्त्यारोप सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला, असा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. तर केंद्र सरकारच्या दबावामुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाराष्ट्राने गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देऊनही हा प्रकल्प गुजरातमधील ढोलेरा येथे जातो हे केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली झालेले आहे. ढोलेरा हे अव्यवहार्य ठिकाण असल्याने आय. एस. एम. सी. डिजिटल या सेमीकंडक्टरच बनविणाऱ्या कंपनीसहीत अनेक कंपन्यांनी तिथून काढता पाय घेतला असल्याने वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प ढोलेराला नेण्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान होणार आहे, असा आरोप सावंत यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, वेदांता कंपनीच्या अंतर्गत अहवालानुसार महाराष्ट्रातील तळेगाव हेच या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी सुयोग्य जागा होती. या करिता तळेगाव आणि ढोलेरा या दोन्ही स्थळांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये ढोलेरा येथे पाण्याची कमतरता, कुशल कामगारांची कमतरता, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन इकोसिस्टिम नसणे तसेच पुरवठादार व दुय्यम उत्पादकांची कमतरता तसेच दलदलयुक्त जमीन अशी अनेक कारणे देऊन नापसंती व्यक्त केली होती. असे असतानाही महाराष्ट्राने गुजरातपेक्षा अधिक भांडवली अनुदानासहित अनेक सवलती देऊनही आयत्यावेळी सदर प्रकल्प ढोलेरा येथे नेण्याचा निर्णय केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली झाला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यात अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन हजारो करोड पाण्यात घातले. ढोलेरा हा त्यातीलच एक प्रकल्प आहे. नुकतेच देशात १० बिलियन डॉलर गुंतवणूकीच्या सेमीकंडक्टर उत्पादनासाठी प्रस्ताव मागितले असताना तीन कंपन्यांनी अर्ज केला. त्यातील एक आय. एस. एम. सी. डिजिटल ही कंपनी ढोलेरामध्ये येणार होती. तीने सुविधा व पाण्याच्या उपलब्धतेअभावी ढोलेरामधून पळ काढला आहे. विशेष म्हणजे या कंपनीबरोबर गुजरात सरकारचा सामंजस्य करार झाला होता. गुगल आणि रिलायन्सचा संयुक्त प्रकल्प जिओफोन ही ढोलेरा सोडून तिरुपतीला गेला. या अगोदर लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन या कंपनीने सोलार बॅटरी प्रकल्पातून माघार घेतली. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने ही ढोलेरा येथे ४०००० कोटी रुपयांचा वॉटरफ्रंट सिटी तयार करण्याचा सामंजस्य करार केला होता. पण जागेचे काही पैसे भरुन ही नंतर माघार घेतली.
[read_also content=”ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’; राम शिंदे यांची टीका https://www.navarashtra.com/maharashtra/vedanta-foxcons-jai-maharashtra-because-of-thackeray-governments-recovery-policy-criticism-of-ram-shinde-nrdm-326070.html”]
जो प्रकल्प महाराष्ट्रात येऊन लवकरच सुरू झाला असता व महाराष्ट्राला रोजगार आणि देशाला उत्पन्न मिळाले असते तो वेदांन्ता फॉक्सकॉन प्रकल्प केंद्र सरकारच्या अट्टाहासाने अडचणीत येण्याची किंवा प्रदीर्घ काळ रखडण्याची शक्यता आहे. याच पद्धतीने गिफ्ट सिटी प्रकल्प रखडला होता. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र तिथे नेले. आज महाराष्ट्रात हे केंद्र असते तर प्रचंड गुंतवणूक येऊन देशाला लाभ झाला असता.
फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असे पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिल्याचा दावा केला जाता आहे पण असा मोठ्या प्रकल्पासाठी महाराष्ट्राला नरेंद्र मोदी यांच्या कृपेची आवश्यकता नाही. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात कायम नंबर एक राहिला आहे तो स्वकर्तृत्वावर. मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत. गुजरात मधील बुडीत गेलेले प्रकल्प यशस्वी करण्याच्या मोदींच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजप नेते महाराष्ट्राला मात्र कमकुवत करत आहेत असे सावंत म्हणाले.