नाशिक – शिवसेना (शिंदे गट) नेते दादा भुसे (Dada Bhuse) यांनी ठाकरे गटावर (Thackeray group) जोरदार निशाणा साधला आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना मंत्री भुसे यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच दावोस दौऱ्यावरुन (Davos tour) टीका करणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. ‘दावोस दौरा ऐकून विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला आहे’ अशी खोचक टीका दादा भुसे यांनी केली.
राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रतेचा निर्णयाची चिरफाड करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महापत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना दादा भुसे म्हणाले, “जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांचे रोज केविलवाणे प्रयत्न सुरू असतात. अध्यक्षांनी जो न्यायनिवाडा केला, त्यात कायदे आणि नियम वस्तुस्थिती यावर न्यायनिवाडा केला. कदाचित न्यायनिवाडा याला दोन बाजू असू शकतात. ज्याला मान्य नाही, त्याला दाद मागण्याचा अधिकार आहे. परंतु जनतेत संभ्रम करणे आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. तुम्ही उद्या सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणार का? याअगोदर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, हे उचित नाही.” अशी टीका दादा भुसे यांनी ठाकरे गटावर केली.
विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला आहे – दादा भुसे
दावोस दौऱ्यावरुन राजकारण रंगले असताना दादा भुसे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. “विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला आहे. महाराष्ट्रात विकास कामांचे जे प्रकल्प आहे, ते बघून जागतिक पातळीवरील गुंतवणूक होईल. तिथून आल्यानंतर किती हजारो कोटींचे करार संपन्न झाले, याची माहिती मुख्यमंत्री देतील. त्याअगोदरच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. आपल्या राज्याचे नाव कमी होईल, यासाठी हे लोक खालच्या पातळीवर आले आहे.” असा घणाघात दादा भुसे यांनी विरोधकांवर केला.