मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील दाव्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. शरद पवार यांनी महा विकास आघाडीच्या युतीचा प्रयोग हा 2019 मध्ये नाही तर 2014 मध्येच होणार होता असा गौप्यस्फोट केला. यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्याबाबत राजकीय गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती असा दावा आता खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
2019 साली शिवसेना व भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन वाद निर्माण झाला. बहुमत असून देखील त्यांचे सरकार निर्माण झाले नाही. त्यानंतर शरद पवार व संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग साधला. त्यामुळे जास्त आमदार असून देखील भाजप विरोधी बाकावर जाऊन बसली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे अभुतपूर्व असे बंड झाले आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे अनेकदा टीका देखील केली जाते. मात्र यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नवा दावा केला आहे. शिवसेना व भाजप युतीमध्ये असताना देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार नव्हते असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
शिंदे कोणालाच नको होते
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला निरोप पाठवला होतो, दिल्लीचा निर्णय काय येईल, हे आम्हाला माहीत नाही. परंतु आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाही. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनंगटीवार यांच्यासह भाजच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला. शिंदे कोणालाच नको होते. शिंदे यांच्या कामाची पद्धत कोणाला नको होती. आम्हीतर एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचे नेते केले होते. त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले असते. परंतु भाजपने विरोध केल्यामुळे तो निर्णय झाला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासारखे लोक कुवत नसताना या ठिकाणी पोहचले
पुढे ते म्हणाले, “भाजपशी चर्चा अयशस्वी झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा सुरु झाली. त्यावेळी या दोन्ही पक्षांनाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नको, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, असे सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, अजित पवार यांनी म्हटले होते, असा दावा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतान केला. एकनाथ शिंदे यांच्यासारखे लोक कुवत नसताना या ठिकाणी पोहचले आहेत.” अशा खोचक शब्दांत संजय राऊत यांनी सुनावले आहे.