रवींद्र धंगेकर यांनी जैन बिल्डींग प्रकरणी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
Jain Boarding Hostel Case: पुणे : पुण्यामध्ये जोरदार राजकीय वाद निर्माण झाला आहे. राजकीय वर्तुळामध्ये महायुतीमध्ये वाकयुद्ध सुरु असलेले दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटामध्ये असणारे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वी रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांनी धंगेकरांवर निशाणा साधला आहे. पुण्यातील जाग्यामोहोळ असा उल्लेख करत मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्री प्रकरणावरुन भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. याच प्रकरणाचा दाखल देत रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांना डिवचलं आहे. सोशल मीडियावर मुरलीधर मोहोळ यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध करुन त्यांनी खासदार मुरलीधर मोहोळ यांचा उल्लेख जाग्यामोहोळ असा केला आहे. त्याचबरोबर पुण्यातील जागा गिळणारे जाग्यामोहोळ अशा शब्दांत खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर महायुतीमध्ये वणवा पेटला असल्याचे दिसून आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचे नेते एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. यामुळे पुण्यामध्ये महायुतीला विरोधकांची गरज नसल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटामध्ये प्रवेश केलेले रवींद्र धंगेकर हे महायुतीला जड जात आहेत. रवींद्र धंगेकर हे भाजप नेत्यांवर निशाणा साधताना दिसून येत आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्याबाबत रवींद्र धंगेकर यांनी पोस्ट देखील केली.
शुभ प्रभात पुणेकर..! pic.twitter.com/Et8Dr1AheK — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 20, 2025
रवींद्र धंगेकर यांनी लिहिले आहे की, अर्धातास प्रेस घेउन बडबड केली पण गडी एकदा पण म्हंटला नाही की हे जैन मंदिर वाचलं पाहिजे.. हा व्यवहार थांबला पाहिजे..!आज पुणेकर म्हणून दुर्दैव या गोष्टीचे वाटते की, आमच्या खासदाराच्या व्यावसायिक भागीदाराने जैन मंदिर बँकेत गहाण ठेबून 70 कोटी रुपये कर्ज घेतले. मंदिर आणि हॉस्टेलची 3000 कोटीची प्रॉपर्टी 300 कोटी रुपयात खिशात घातली आणि आमचा खासदार ना जैन मंदिराबद्दल काही बोलत ना हा व्यवहार थांबवण्यासाठी काही प्रयत्न करत.कारण जैन समुदायाच्या भावनांपेक्षा यांना यांचा व्यावसायिक भागीदार महत्त्वाचा आहे आणि या छुप्या भागीदारीतून मिळणारा मलिदा महत्त्वाचा आहे, अशा शब्दांत रवींद्र धंगेकर यांनी टीकास्त्र डागले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेमकं प्रकरण काय?
शिवाजीनगर येथे असलेल्या जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेवरून तीव्र वाद निर्माण झाला आहे. या परिसरात दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन अशी दोन वसतिगृहे आहेत. १९५८ साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहांची उभारणी केली होती. अलीकडच्या काही महिन्यांत या जागेवर नवीन विकास प्रकल्प राबविण्याच्या विश्वस्तांच्या प्रस्तावामुळे वाद निर्माण झाला. काही समाजबांधवांनी या विकास योजनेला विरोध दर्शवला होता. मात्र, अलीकडेच ही जागा परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप जैन समाजाकडून करण्यात आला आहे. समाजाच्या म्हणण्यानुसार, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या जमीनविक्रीस मंजुरी देताना संबंधित नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केले. तसेच या व्यवहारात गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा सहभाग असून, त्या कंपनीचे संबंध खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.