मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार (Modi Govt) व राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राम मंदिर उद्घाटनावरुन (Ayodhya Ram Mandir inauguration) देखील राऊत यांनी मोदी सरकारवर (Narendra Modi) घणाघात केला. मंदिर बाबरी मशीदच्या (Babri Masjid) जागी न बांधता लांब बांधल्यामुळे राऊत यांनी आक्रमक भूमिका मांडली. ‘मंदिर वहीं बनाऐंगे’ या घोषणेचं काय झालं असा सवाल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडला.
संजय राऊत राम मंदिराच्या जागेबद्दल बोलताना म्हणाले, “बाबरी मशीद जिथे पाडली गेली, तिथे राम मंदिर होणे अपेक्षित होते. मात्र त्याठिकाणी मंदिर बांधण्यात आलेले नाही. मंदिर वही बनायेंगे असा नारा भाजपाने दिला होता. ज्या जागेवर मंदिर बनविण्याची घोषणा केली गेली होती, त्याठिकाणी मंदिर बांधले गेलेले नाही. विवादित जागेपासून चार किलोमीटर दूर मंदिर बनविले जात आहे. मग ते कधीही बनविता आले असते. जिथे आम्ही मंदिर बांधण्यासाठी आग्रही होतो, तिथे मंदिर बांधले गेलेले नाही. मग मंदिर वही बनायेंगेचा नारा जनतेला मूर्ख बनविण्यासाठी दिला गेला का? असा गंभीर प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
भाजप या पीठाचे मोदी हे शंकराचार्य
शंकराचार्य यांनी घेतलेल्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती न लावण्याच्या निर्णयावरुन राऊत यांनी भाजपला घेरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच शंकराचार्य आहेत. चार पिठाच्या शंकराचार्यांपेक्षाही त्यांचे स्थान मोठे आहे. देशात चार पीठांच्या व्यतिरिक्त एक नवे पीठ निर्माण झाले आहे, त्याचे नाव बीजेपी पीठ असून त्याचे शंकराचार्य मोदी स्वतःच आहेत. ते शास्त्र पाहत नाहीत, निवडणुकीआधी त्यांच्या मनाला वाटले, तेच ते करतील अशा शब्दांत संजय राऊत यांनी जहरी टीका केली.