File Photo : Eknath Shinde
सिंधुदुर्ग : राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. यंदाची निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. प्रत्यक्षात मात्र महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागला. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या निकालानंतर अनेक गौप्यस्फोट केले जात आहेत. तर महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याचे दिसून आले आहे. महायुतीमध्ये सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपद, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्री अशाच सर्वच मुद्द्यांवरुन राजकारण रंगले. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे दिसून येत आहे. अनेक शासकीय कार्यक्रमांना एकनाख शिंदे यांची अनुपस्थिती आणि त्यांची कार्याची पद्धत यामुळे आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना डावलले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
सिंधुदूर्गामध्ये वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना डावलून अनेक निर्णय घेत जात असल्याचे बोलले जात आहे. याबाबत वैभव नाईक म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत युती का केली नव्हती, हे आता एकनाथ शिंदे यांना कळलं असेल. सर्वच निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. फडणवीस कोणालाही विश्वासात घेत नाहीयेत. पहिले महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा,” असा टोला ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. यामधून ठाकरे गटाचे नेते अनेक गळाला लागत आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. राजन साळवी यांच्यानंतर पाच नगरसेवकांनी देखील ठाकरे गटाची साथ सोडली आहे. यामुळे ठाकरे गटाला गळती लागली आहे. भास्कर जाधव व संजय पडते हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. यावर वैभव नाईक म्हणाले की, “संजय पडते यांच्याशी आम्ही बोलू. आमचे वरिष्ठ देखील बोलतील” असे मत वैभव नाईक यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऑपरेशन टायगरवर टीका करताना ते म्हणाले की, “आम्ही गद्दारी करणार नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काही लोकांनी गद्दारी केली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही हीच शपथ घेतो की, आम्ही गद्दारी करणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही प्रामाणिक राहू, असे मत वैभव नाईक यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, शिवसेना फुटीच्या वेळेला सुद्धा आम्हाला ऑफर होत्या. आम्ही त्या ऑफर नाकारल्या आहेत. आमचं जरी नुकसान झालं असलं तरी आम्हाला त्याचा अभिमान आहे. ऑफर आल्या तरी आम्ही त्या नाकारू,” असा स्पष्ट एल्गार वैभव नाईक यांनी केला आहे.