सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाटस : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी चळवळीचे नेते आणि रयत क्रांती पक्षाचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे जिल्ह्यात भाजपसह महायुतीच्या मित्र पक्षांना दे धक्का देण्यास सुरुवात केली आहे. इंदापूर तालुक्यानंतर आता दौंड तालुक्यातही अनेक मातब्बर नेते शरदचंद्र पवार पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. शेतकरी चळवळीचे नेते भानुदास शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात केलेला प्रवेश हा शेतकरी संघटनेचे नेते आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना राजकीय धक्का मानला जात आहे.
दौंड तालुक्यातील कानगाव येथील आणि मागील २५ वर्षांपासून शेतकरी चळवळीचे लढाऊ कार्यकर्ता असलेले शेतकरी संघटनेचे नेते भानुदास शिंदे यांनी शनिवार (दि. 3 ) पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला.
शरदचंद्र पवार पक्षाची दौंडमध्ये ताकद वाढली
शिंदे हे सध्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते. शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरदचंद्र पवार गट) ताकद आणखीन वाढली असून भाजप विशेषतः आमदार राहुल कुल यांनाही हा राजकीय धक्का मानला जात आहे.