कणकवलीमध्ये सध्या विधानसभेच्या प्रचार शिगेला पोहचला असून राजकारणही तापले आहे. कुणकेश्वर येथील रापण महोत्सवाच्या कार्यक्रमात भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नितेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर एकाच व्यासपिठावर एकत्र आल्याने सर्वांचा भुवया उंचावल्या आहेत. या एकत्र येण्यावरुन अनेक अर्थ काढले जात आहेत. दरम्यान कणकवलीतील अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनीही दोंघांवर हातमिळवणीचा आरोप केला आहे.
मी भाजपाचे आ. नितेश राणे आणि ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांना हरवणार
कणकवली विधानसभा मतदार संघात २६३ गावांपैकी १८० ते २०० गावांपर्यंत मी यशस्वी प्रचार केलेला आहे. उरलेल्या काही दिवसांत सर्व गावांपर्यंत पोहचणार आहे. माझा मुस्लीम समाज व सर्व जाती धर्माचे लोकांचा प्रतिसाद लाभत आहे. परंतु नितेश राणे व संदेश पारकर यांची हातमिळवणी पक्की असल्याचे आता उघड झाले आहे. कारण कालच कुणकेश्वर येथील रापण महोत्सवाच्या कार्यक्रमात दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित राहुन हस्तांदोलन करत आहेत. हे लोकांना मुर्ख बनविण्याचे काम करत आहेत. हे जनतेसमोर उघड झाले आहे. त्यामुळे मी भाजपाचे आ. नितेश राणे आणि ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांना हरवणार असल्याचा विश्वास कणकवलीचे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी व्यक्त केला आहे.
प्रचारामध्ये लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ज्या-ज्या गावांमध्ये मी प्रचारासाठी जात आहे. त्याठिकाणी उत्स्फुर्त प्रतिसाद मला लाभत आहे. मुस्लीम समाजा विरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्या आ.नितेश राणे यांच्यासमोर माझे तगडे आव्हान आहे. त्यामुळे संदेश पारकर आणि नितेश राणे या दोन्ही उमेदवारांसमोर मी आव्हान निर्माण केलेले आहे. रापण महोत्सवात उपस्थिती लावुन संदेश पारकर यांनी नितेश राणेंबरोबरची हातमिळवणी लोकांसमोर उघड झाल्याचा टोला अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी लगावला.
कणकवली मतदारसंघातील लढत
कणकवली मतदारसंघामध्ये मागील दोन विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांनी अनुक्रमे कॉंग्रेस आणि भाजप या पक्षांकडून विजय मिळवला आहे. विद्यमान आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून बंदेनवाज खानी उभे आहेत. या मतदारसंघाची लढत ठाकरे गटाकडून आणि राणेंकडुन प्रतिष्ठेची केली आहे. महत्वाचे म्हणजे उद्या 13 नोव्हेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. ठाकरे यांची कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर दुपारी 1.30 वाजता संदेश पारकर यांच्यासाठी सभा होणार आहे. त्यामुळे ते काय बोलतात याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.