राज्यात लव्ह जिहाद विरोधात विशेष समितीची स्थापना, काय आहे विशेष समितीची रचना आणि कार्य?
Love Jihad Law News Marathi: आंतरधर्मीय विवाहांच्या नावाखाली होणाऱ्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या लव्ह जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कठोर पावले उचलताना दिसत असून, पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीचे गठन करण्यात आले आहे. ही समिती इतर राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी तसेच सक्तीच्या अथवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतर विरोधात केलेल्या कायद्याचा अभ्यास करून राज्यातील कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे. याबाबत कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे आभार मानले आहेत.
लव्ह जिहाद ही एक मोठी समस्या असून अशा प्रकारच्या तक्रारी रोखण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काम केले जात आहे. लव्ह जिहाद प्रकरणे रोखण्यासाठी काम करणारी समिती महिला व संस्कृती रक्षणासाठी काम करेल, असे ठाम मत मंत्री लोढा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे. महायुती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात महिला व बालविकास विभागाची जबाबदारी असताना मंत्री लोढा यांनी अंतरधर्मीय विवाह समन्वय समिती गठीत केली होती, या समितीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या घटनांना समोर आणण्यासाठी काम करण्यास मदत होईल.
याप्रकरणी आमदार रईस शेख हे एकप्रकारे लव्ह जिहाद प्रकरणाचे समर्थक आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो, कारण लव्ह जिहाद विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांनी तक्रार दाखल केली होती आणि या माध्यमातून अप्रत्यक्षपणे लव्ह जिहादचे समर्थन केले होते. परंतु आता या समितीच्या माध्यमातून लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्यासाठी काम केले जाईल, असा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मुंबईसह परिसरात मागील काही दिवसांत लव्ह जिहादच्या झालेल्या दुर्दैवी घटनांची माहिती देखील मंत्री लोढा यांनी यावेळी दिली. पुढे बोलताना लोढा म्हणाले, “आफताब अमीन नामक व्यक्तीने श्रद्धा वालकरची तुकडे करून हत्या केली. रूपाली चंदनशिवे या तरुणीची हत्या इक्बाल शेखने केली. पूनम क्षीरसागर या तरुणीला निजाम खानने मारले. उरणच्या यशश्री शिंदेला दाऊद शेखने मारले. मालाडच्या सोनम शुक्लाचा शहाजीब अन्सारीने दुर्दैवी अंत केला.” अशाप्रकारे लव्ह जिहाद प्रकरणात कोणी हत्या केल्या? कोणत्या भावनेने केल्या? हे समोर दिसत असताना देखील लव्ह जिहादसारखे काही घडत नाही, असे तुम्ही कसे म्हणू शकता? असा सवाल मंत्री लोढा यांनी आमदार रईस शेख यांना विचारला आहे. त्याचप्रमाणे आता राज्य सरकारने लव्ह जिहाद विरोधात पावले उचलली असताना ज्या पीडित कुटुंबांना न्याय मिळेल, त्यांना रईस शेख काय उत्तर देतील? असा प्रश्न मंत्री लोढा यांनी उपस्थित केला आहे.