कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाबाबत फडणवीस यांनी घेतली भेट
मुंबई: कोराडी येथील २×६६० मेगावॅट क्षमतेचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र प्रकल्पात सुपर क्रिटीकल टेक्नॉलॉजीचा वापर करावा. जास्तीत जास्त क्षमतेच्या हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कोराडी विद्युत प्रकल्पासंदर्भात विधानभवनातील समिती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोराडी विद्युत प्रकल्पासाठी वेस्टर्न कोल इंडियाचा कोळसा वापरावा. जास्तीत जास्त क्षमतेने हा प्रकल्प चालविताना कमीत कमी प्रदुषण होईल याकडे लक्ष द्यावे. हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक होईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच या प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज कमीत कमी दरात मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. गारेपालमा येथील कोळशाच्या वापरासाठी त्याच्या जवळच आणखी एक विद्युत प्रकल्प उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding Koradi power project
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोराडी ऊर्जा प्रकल्पासंदर्भात बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में कोराड़ी ऊर्जा परियोजना के संदर्भ में बैठक🕒 2.55pm | 24-3-2025📍Vidhan… pic.twitter.com/17B8vAte8g
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 24, 2025
महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. १४३३७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यात एफजीडी व एससीआर संयंत्र वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमिन उपलब्ध असून आणखी भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
महापारेषणबाबत फडणवीस यांचे निर्देश
राज्यात विविध क्षेत्रांसाठीच्या वीजेची मागणी लक्षात घेऊन आवश्यक वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्दैश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व ठिकाणची कामे तातडीने विनाविलंब पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पालघरमध्ये जास्त प्रमाणात कामे प्रलंबित असून त्या कामांची तातडीने पूर्तता करावी. वाढवणच्या दृष्टीने विचार करुन टीबीसीबी प्लॅनिंग अतंर्गत गतीशक्ती प्लॅटफॉर्मवर त्याच्या नियोजनाचा विचार करावा. तसेच नवी मुंबई डेटा सेंटर हबला ग्रीन पॉवर देण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्याचे सूचित करुन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्थानिक राजकीय वा इतर कुठल्याही हस्तक्षेपाला न जुमानता सर्व संबंधित यंत्रणांनी ट्रान्समिशन टॉवरच्या उभारणीच्या कामांना गती द्यावी.