उमरखेड : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ब्राम्हणगाव येथील शेतकऱ्यांचा ऊस शॉर्टसर्किटमुळे आगीत जळून खाक झाला. अगोदरच प्रचंड अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. मंगळवारी (दि. 19) दुपारी अचानक हवेचा वेग वाढला व शेतातून गेलेला विजेचा तारांचे एकमेकांना घर्षण झाले. यात पार्किंग होऊन तोडणीला आलेल्या ऊसाने पेट घेतला. यामध्ये दीड एकर ऊस जळून खाक झाला.
हेदेखील वाचा : गोंदियात झाले 69.74 टक्के मतदान; तरीही तब्बल 3 लाख 40 हजार मतदारांची मतदानाला दांडी
ब्राम्हणगाव येथील शेतकरी कोंडबा संभाजी म्हैसकर यांच्या सर्वे नंबर 110 पैकी 1 या क्षेत्रातील एक एकर ऊस व त्यांचे बंधू रामचंद्र संभाजी म्हैसकर यांचा सर्वे नंबर 110 या क्षेत्रातील 20 आर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेला ऊस तोडणीच्या तोंडावर जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुधवारी (दि. 20) महावितरण कंपनीने शेतीचा पंचनामा करून नॅचरल शुगर गुंज या कारखानाकडे पाठवला असून, शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष ब्राम्हणगाव शिवारातील म्हैसकर यांचे शेत हे कालव्याला लागून आहे. येथील महावितरणची यंत्रणा ही जीर्ण झालेली असून, दरवर्षी दुरूस्ती ठेकेदाराच्या नावाने मोठ्या प्रमाणात भष्टाचार करणारे अधिकारी व लाईनमन शेतकऱ्यांच्या तक्रारीची कधीच दाखल घेत नाहीत.
ग्रामीण भागातील शेतीविजकडे यांचे विशेष दुर्लक्ष आहे. या संदर्भात पावसाळ्यापूर्वी महावितरणला कळवून देखील किरकोळ दुरूस्ती केल्यामुळे हे संकट शेतकऱ्यावर आले. यामुळे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान त्यांच्याकडून वसुल करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
कारखाना आता नोंद असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस किती दिवसात तोडून नेते याकडे आपदग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ऑक्टोबर महिन्यातील लागवड असल्यामुळे ऊस वजनदार भरतो व उतारा देखील जास्त येतो. ऊस जळाल्यामुळे त्याच्या वजनात घट होते. तसेच कारखाना देखील त्यामध्ये कपात करतो. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
हेदेखील वाचा : एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात; महाविकास आघाडी इतक्या जागा जिंकणार, विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा