Tasgaon Gutkha Seizure: प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर पोलिसांचा घाव; ११.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त
Tasgaon News: प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीविरोधात तासगाव पोलिसांनी धडक कारवाई करत ११ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणातील गुटखा, सुगंधित तंबाखूचा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली असून चालकाला अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली.
११ जून रोजी रात्री तासगाव-विटा मार्गावरील लिंब गावच्या हद्दीत संशयित टोयोटा इनोव्हा (एमएच १५ सीएम ५८३५) वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
कारवाईत ४ लाख ८४ हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला (केसरयुक्त) गुटखा जप्त करण्यात आला. सुमारे २१७.८ किलो वजनाच्या या साठ्यात २,२०० पाऊच आढळले. तसेच ४८ हजार ४०० रुपये किमतीची ‘व्ही-१’ सुगंधित तंबाखूही जप्त करण्यात आली. या मालामध्ये २,२०० पाऊच असून त्याचे वजन सुमारे ३३ किलो आहे.
याशिवाय गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ७ लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. अशाप्रकारे एकूण ११ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईदरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रणव जिनगर आणि अनिल पवार यांनी वाहनातील मालाची तपासणी करून पंचनामा केला. त्यांच्या अहवालानंतर प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या प्रकरणी गणेश आनंदा निकम (वय ३६, मूळ रा. पळशिवणे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, सध्या रा. कबनूर, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करीच्या साखळीवर पोलिसांनी मोठा आघात केला असून प्रतिबंधित तंबाखू पदार्थांच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे करीत आहेत.






