सौजन्य - नवराष्ट्र टीम
तासगाव : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. आशातच आता तासगाव नगरपरिषद २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीची तापलेली हवा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असून, शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तासगाव पोलिसांनी कडक बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले आहे.
शुक्रवारी सायंकाळी शहरातील प्रमुख भागांत ताफ्यासह पायी संचलन करत पोलिसांनी स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या मोहीमेचे मार्गदर्शन पोलिस उपाधीक्षक अशोक भवड यांनी केले. पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व १२ प्रभागांतील ३६ मतदान बूथचे निरीक्षण करण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत निवडणूक काळात शांतता व सहकार्य राखण्याचे आवाहन केले. तासगाव नगरपरिषदमध्ये तिरंगी लढत होणार असल्याची चिन्हे स्पष्ट होत असताना, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरुवातीपासूनच पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना राबविल्या जात आहेत. संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच, निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची भूमिकाही पोलिसांनी स्पष्ट केली आहे.
नागरिकांनी कायद व सुव्यवस्था राखावी
नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, तसंच सोशल मीडियावर अफवा पसरणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तासगावचा निवडणूक रणसंग्राम तापत असताना, पोलिसांचा हा ‘वॉच’ शहरात सुरक्षिततेची हमी देणारा ठरत आहे.






