मार्चच्या मध्यातच उन्हाचा कडाका वाढला; आरोग्य जपण्यासाठी आवश्यक खबरदारी महत्त्वाची (File Photo)
इंदापूर : इंदापूर तालुक्यात मार्च महिन्याच्या मध्यातच तापमानाने ३८ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने नागरिकांना उष्णतेचा चांगलाच त्रास जाणवू लागला आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागते, तर दुपारच्या सुमारास कडक उन्हामुळे रस्ते आणि बाजारपेठांमधील वर्दळही काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
विशेषतः दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका अधिक असल्यामुळे शेतकरी, बांधकाम मजूर, रस्त्यावर काम करणारे कामगार तसेच बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना उष्णतेचा अधिक परिणाम होत आहे. तापमान वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे. बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. दिवसभरात पुरेसे पाणी पिणे, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रव पदार्थ घेणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. हलके, सैल आणि सूती कपडे वापरणे तसेच दीर्घकाळ उन्हात उभे राहणे टाळणेही गरजेचे आहे.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून, शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वेळोवेळी पाणी पिणे, थेट उन्हात जास्त वेळ राहणे टाळणे आणि प्रकृती बिघडल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.
लिंबू-पाण्यासह थंड पेयासाठी नागरिकांची गर्दी
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे शहरातील लिंबूपाणी, रसवंतीगृह तसेच विविध शीतपेयांच्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. कडक उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून अनेक जण थंड पेयांचा आस्वाद घेताना दिसत आहेत.
पुणे शहरातही तापमानात मोठी वाढ
दुसरीकडे, पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने झेप घेतल्याने पुणेकर उकाड्याने हैराण झाले आहेत. बुधवारी (ता. ११) शहरात किमान १७.५ अंश सेल्सिअस, तर कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हे देखील वाचा : दिलासादायक ! युद्धादरम्यानचं तेल संकट आता लवकरच दूर होईल; 32 देशांनी उघडले आपात्कालीन साठे






