दोन दिवसांपूर्वी ठाण्यात (Thane Hospital) पाच रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. असे असतानाच ठाण्यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच रात्रीत शिवाजी रुग्णालयात 17 रुग्ण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असताना रुग्ण दगावत असल्याच्या घटना दोन दिवसांपासून सातत्याने पाहिला मिळत आहे. त्यानंतर आता ठाण्यातील रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. रूग्णालयातील 13 रुग्ण हे आयसीयूमधील आणि 4 रुग्ण हे जनरल वॉर्डमध्ये होते. तर काही रुग्णांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.यावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. हे प्रकरण नेमकं कशामुळे झालं आहे, याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. याबाबत चौकशी समिती तयार करण्यात अली असून, अहवाल मागवला आहे. अहवाल येताच नक्की कारवाई होईल असेही सावंत म्हणाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री गिरीश महाजन हे दोघे ही यावर लक्ष ठेऊन असल्याचे सावंत म्हणाले.
दोषींवर कठोर कारवाई केली जाणार
मी सातत्याने या घटनेची माहिती घेत आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत असल्याचे मंत्री तानाजी सावंत म्हणाले. वैद्यकीय शिक्षण या अंतर्गत ते हॉस्पिटल येते. तरी सुद्धा मृत्यू हा मृत्यू आहे. नेमकी कशामुळे ही घटना घडली याचा अहवाल एक ते दोन दिवसात येईल असे सावंत म्हणाले. दरम्यान, मृत्यू झालेले 13 रुग्ण हे आय सी यू मध्ये तर 4 रुग्ण हे जनरल वार्डमधील आहेत. याबाबत रुग्णालयाच्या डीनचे दुर्लक्ष झालं का हे पाहावं लागेल असेही सावंत म्हणाले.ठाणे रुग्णालयाच्या घटनेबाबत दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सावंत म्हणाले. सध्या सुरु असलेल्या डोळ्याच्या साथीवर देखील सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत आमच्याकडून पूर्ण तयारी झाली आहे. पथके तयार करुन यासंदर्भात मोहीम राबवली जात असल्याचे सावंत म्हणाले. जवळपास 1 हजार 600 ते 1 हजार 700 नवीन डॉक्टरची भरती एम पी एस सी आयोगाला दिली असल्याचे सावंत म्हणाले. आम्ही पावसाळी अधिवेशनात मोफत उपचाराची घोषणा केली असल्याचे मंत्री तानाजी सावंत म्हणाले.






