ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली आहे. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने गणपतीचीम मुर्तीची मनोभावी सेवा करतात. याचपार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्ताने दीड लाखाहून अधिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. यामध्ये 1 लाख 56 हजार 782 घरगुती आणि 1 हजार 60सार्वजनिक गणेशमूर्तीचा सामावेश आहे. सर्वाधिक सार्वजनिक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा ठाणे शहरात झाली आहे. सर्वाधिक घरगुती गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा उल्हासनगर ते बदलापूर या भागात झाली आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात एकूण पाच परिमंडळे येतात. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, वागळे इस्टेट या परिमंडळांचा समावेश आहे. यंदा 1 लाख 56 हजार 782 घरगुती आणि 1 हजार 60 सार्वजनिक असे एकूण 1 लाख 57 हजार 842 गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. यापैकी ठाणे, कळवा, दिवा, शिळफाटा या भागात 325 इतक्या सार्वजनिक गणेशमूतींची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तर सर्वाधिक घरगुती गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरात झाले असून तेथे 49 हजार 469 गणेशमूर्तीची स्थापना झाली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील फुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, परिणामी ठाण्यातील फुलबाजारात फुलांची आवक घटल्याने फुलांच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर ही दरवाढ झाली असून शेवंतीचे दर 400 रूपये किलो तर, गुलाब 600 रूपये किलोने विकला जात आहे. इतर फुलांचे दरही दुप्पटीने वाढले आहेत. गोंडा आधी 60 ते 80 रुपये किलोने विकला जात होता. आता 200 रूपये किलोने विकला जात आहे. तसेच शेवंती आधी 100रूपये किलो तर आता 400रूपये किलोने विक्री होत आहे. गुलाब आधी 200रूपये किलोने होता. आता 600रूपये किलोने विक्री होत आहे. सजावटीसाठी वापरली जाणारी अस्टरची फुले आधी 80 रूपये किलोने विक्री केली जात होती. आता 180ते 200रूपये किलोने विक्री होत आहे.