ठाणे/ स्नेहा काकडे : युनियन बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय ठाणे-मुंबई तर्फे ८ ऑगस्ट २०२५ रोजी स्व. छाया एकनाथ पाटील मंगल भवन, ग्रामपंचायत – काल्हेर येथे भव्य वित्तीय समावेशन मेळावा व मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) यांच्याकडून 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या सर्वसमावेशक विशेष मोहिमेच्या अनुषंगाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ही विशेष मोहीम प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) अंतर्गत नवीन खाते उघडणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि अटल पेन्शन योजना (APY) मध्ये नोंदणी, खातेदारांचे Re-KYC, निष्क्रिय PMJDY खाती सक्रिय करणे, बचत खात्यात नामनिर्देशन (Nomination) अद्ययावत करणे, डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती आणि अदाव्या ठेवींमध्ये प्रवेश व तक्रार निवारण प्रणालीबद्दल माहिती देणे या बाबींवर भर देण्यात येत आहे.
कार्यक्रमाला संजय रुद्र, कार्यकारी संचालक, युनियन बँक ऑफ इंडिया; बी. पी. दास, विभागीय प्रमुख, मुंबई; अमित भाटिया, क्षेत्र प्रमुख, ठाणे; राजकुमार, उप क्षेत्र प्रमुख, ठाणे; सौ. श्रुती वेणुगोपाल, उप क्षेत्र प्रमुख, ठाणे; सुधांशु अश्विनी, DDM, नाबार्ड, अभिषेक पवार, LDM, ठाणे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
ग्राहकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने विविध काउंटर उपलब्ध करून दिले, जसे की – नवीन खाते उघडणे; PMSBY, PMJJBY, APY यामधील नोंदणी Re-KYC अद्ययावत करणे, नामनिर्देशन करणे, डिजिटल फसवणुकीबाबत जनजागृती तसेच बिझनेस करस्पॉन्डंट्स (BC) च्या माध्यमातून त्वरित खाते उघडणे व विमा नोंदणी करण्यात आली. यासोबतच मोफत आरोग्य तपासणी सुविधा ही सर्व सहभागींसाठी उपलब्ध करून देण्यात आली.
या शिबिरात ३०० हून अधिक नागरिक सहभागी झाले. यामध्ये स्वयंसहाय्यता गट (SHG) सदस्यांचा मोठा सहभाग होता. SHG सदस्यांच्या हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने प्रदर्शन व विक्री स्टॉल्स उपलब्ध करून दिले होते.
संजय रुद्र, कार्यकारी संचालक, यांनी यावेळी DFS मार्फत राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले आणि उपस्थित नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युनियन बँक ऑफ इंडिया येत्या काळात देखील अशाच प्रकारची विस्तृत विशेष मोहीम आयोजित करण्यास कटिबद्ध आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वित्तीय समावेशन व जागृती पोहोचवता येईल.
आपण सर्वजण एका अशा देशात राहतो जिथे प्रगतीची स्वप्नं फक्त शहरापुरती मर्यादित नसून ती प्रत्येक खेड्यात आणि प्रत्येत दारात जावीत ही गरज आहे. कोणत्याही देशाची वाटचाल तेव्हाच पूर्ण होते जेव्हा देशातील शेवटच्या माणसालाही त्याचा हक्क आणि बँकेचा दरवाजा सर्वांसाठी उघडतो. आजचा हा कार्यक्रम म्हणजे देशातील प्रत्येक गावामध्ये बँकींग सेवा, विमा, पेन्शन, बचत आणि कर्ज या सुविधा पोहोचवण्याचा एक टप्पा आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.