ठाणे / स्नेहा जाधव,काकडे : ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या 37 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला. शुक्रवारी (29 ऑगस्ट) सायंकाळी झालेल्या या आढावा बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी, अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी सातत्याने संवाद साधून त्यांना अशा इमारतीत राहण्यास असलेल्या धोक्यांची कल्पना देऊन त्या इमारती लवकरात लवकर रिक्त करून घ्याव्यात, असे स्पष्ट केले. तसेच, ज्या धोकादायक इमारती रिक्त करून त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, त्याबद्दलही रहिवाशांशी संवाद साधण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगररचना सहायक संचालक संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त सचिन सांगळे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 93 अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी 56 इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित 37 इमारतींमध्ये एकूण 191 कुटुंबे वास्तव्यास आहेत. पावसाळ्यापूर्वीपासून परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त या रहिवाशांशी संपर्क साधून इमारती रिक्त करण्यासंदर्भात विनंती करीत आहेत. महापालिका या इमारती रिक्त करून त्याचा ताबा कोणाकडेही देणार नाही. त्या इमारती रहिवाशांच्या ताब्यात राहतील, याविषयी रहिवाशांनी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असेही आयुक्त राव यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.
आपापल्या क्षेत्रातील सर्व अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींवर आवश्यक त्या सूचनांचे फलक पावसाळ्यापूर्वी लावण्यात आले होते. ते फलक पुन्हा लावण्यात यावेत. तसेच, धोकादायक इमारती कोणत्या प्रकारचे संकेत देतात याची माहिती घरोघरी पत्रकाद्वारे दिली जावी. रहिवाशांचे व्हाट्सअप ग्रुप करून त्यावरही त्यांना ही माहिती द्यावी. इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही रहिवाशांपर्यंत पोहोचवावे, असे आयुक्त राव यांनी सांगितले.
सर्व परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी अतिधोकादायक इमारतीत अजूनही वास्तव्य करून असलेल्या रहिवाशांशी सातत्याने संपर्कात रहावे. त्यांना इमारती रिक्त करण्याविषयी विनंती करून इमारतीच्या ताब्याविषयी आश्वासत करावे. अतिधोकादायक इमारतीत राहणे जीवावर बेतू शकते, याची त्यांना कल्पना द्यावी असेही राव यांनी पुन्हा एकवार स्पष्ट केले आहे.
सी वन वर्गवारीतील अतीधोकादायक इमारती पूर्णपणे रिक्त करणे आवश्यक आहे. तर, सी टू ए आणि बी या वर्गवारीतील धोकादायक इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणे आवश्यक असते. दुरुस्ती काळात या धोकादायक इमारतीत कोणी वास्तव्य करू नये. याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सर्व माध्यमांमधून पोहोचवावी. संबंधित इमारतीवर तसे फलक पुन्हा लावण्यात यावेत असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले.
अतिधोकादायक इमारतींची (सी वन वर्गवारी) प्रभाग समितीनिहाय संख्या
नौपाडा – कोपरी : 27
उथळसर : 07
दिवा : 02
मुंब्रा : 01
वागळे : 00
लोकमान्य नगर- सावरकर नगर :00
माजीवडा-मानपाडा :00
वर्तकनगर : 00
कळवा :00 अशी यादी पालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे.