नवी मुंबई /सिद्धेश प्रधान : नवी मुंबईत पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहे. 22 एप्रिल रोजी शिवसेनेचा वाशी येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात महाविकास आघाडीचे तब्बल १२ माजी नगरसेवक शिंदे सेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. रविवारी नवी मुंबईत सर्वत्र पक्ष प्रवेशाची बॅनरबाजी झालेली पाहायला मिळत आहे. ऐरोली विधानसभा मतदार संघात शिंदे गटाने प्राबल्य वाढलेले असताना, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बेलापुर विधानसभा जिल्हाप्रमुख पदाची मिळालेली जबाबदारी पार पाडत किशोर पाटकर यांची देखील १२ पैकी १० नगरसेवक आल्याने ताकद पक्षाची ताकद वाढवली आहे. देखील आता बेलापुर विधानसभेची ताकद वाढवली आहे. त्यामुळे येत्या काळात पालिका निवडणुकांमध्ये युती झाल्यास जागावाटपात दोन्ही शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे.मात्र सध्याचे वातावरण पाहता दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्यासाठी उत्सुक असण्याची शक्यता आहे.
वाशीतील काँग्रेसचे माजी उपमहापौर अविनाश लाड व त्यांच्या पत्नी, ऐरोली येथील माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे, त्यांचे पती नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अंकुश सोनावणे, सानपाडा येथील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, माजी नगरसेविका कोमल वास्कर, नेरूळ येथील माजी नगरसेवक रतन मांडवे, माजी नगरसेविका सुनीता रतन मांडवे, माजी नगरसेवक काशिनाथ पवार, माजी नगरसेवक रंगनाथ औटी, बेलापुर येथील माजी नगरसेविका भारती कोळी, यांचा सुद्धा पक्ष प्रवेश होणार आहे.
विजय नाहटा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत पक्षापासून फारकत घेतली होती. अल्पावधीत जिल्हाप्रमुख म्हणून किशोर पाटकर यांच्यावर पक्षाने जबाबदारी टाकली. ती जबाबदारी सांभाळत सांभाळत त्यांनी मंदा म्हात्रे यांना त्यांच्या विभागातून मताधिक्य देत आपली जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांचे जनसंपर्क कार्यालय असो वा माविआच्या १२ माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याची किमया पाटकर यांनी पार पाडली आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे शाब्दिक कोटी करण्यात धन्यता मनात असताना, एकनाथ शिंदे मात्र आमदारांसह, नगरसेवक तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना देखील आपल्या कामातून आपलेसे करत आहेत. समस्येसाठी गेलेला कोणताही कार्यकर्ता समस्या सुटल्याशिवाय त्यांच्याकडून येत नसल्याचे चित्र संपूर्ण राज्यात एकनाथ शिंदेबद्दल तयार झाले आहे. राजकारण व समाजकारण करताना लागणारी आर्थिक ताकद देखील शिंदेकडून कामांच्या स्वरूपात मिळत असल्याने कार्यकर्ते संघटनेसाठी २४ तास उपलब्ध असल्याचे चित्र सध्या सर्वत्र आहे. त्यामुळेच नेत्यांसह सामान्य कार्यकर्ते देखील शिंदे सेनेत प्रवेश करत आहेत.
राज्यात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी हे मित्र पक्ष म्हणून सत्तेत आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना या तिन्ही पक्षांना स्वतःचे महापौर बसवून सत्ता राबविण्याची खुमखुमी आहे. मात्र नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे व गणेश नाईकांच्या विस्तव जात नसल्याचे चित्र आहे. जिथे संधी मिळेल तिथे हे दोन्ही नेते व त्यांचे पदाधिकारी एकमेकांना शाह देताना जनतेते पाहिले आहे.
त्यामुळे भाजपा बेलापुरात ताकदवान असताना, आता १२ नगरसेवकांमुळे शिवसेना भक्कम झाली आहे. दुसरीकडे मूळ भाजपतील पदाधिकाऱ्यांना नव्यांकडून तिकीट वाटपात वगळल्यास पडद्याआडून भाजपाच्या या नाराज पदाधिकाऱ्यांकडून देखील शिवसेनेला मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश नाईकांसमोर येत्या काळात बाह्य तसेच अंतर्गत आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.आमदार मंदा म्हात्रेंचे देखील या घडामोडींकडे लक्ष राहणार आहे.