भाईंदर, विजय काते : मीरा-भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरात काल सकाळी घडलेली भीषण रस्ता दुर्घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. RNA बिल्डरकडून सुरू असलेल्या बांधकामामुळे आणि त्यांच्या निष्काळजी कारभारामुळे नव्याने बनवलेल्या सीसी रस्त्याचा मोठा भाग कोसळला. विशेष म्हणजे ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्टपणे कैद झाली असून याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
तपोवन शाळेच्या मागील भागात RNA बिल्डरकडून पायलिंगचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक जमीन धसली आणि रस्त्याखालचा भाग कोसळून गेला. संपूर्ण मलबा आतमध्येच समाविष्ट झाला. या घटनेत जीवितहानी टळली असली तरी परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या दुर्घटनेमुळे नव्याने बनवलेला सीसी रोड पूर्णपणे खचून गेला असून पाणीपुरवठा, स्वच्छता गटार व्यवस्था, तसेच शिवरेज लाईन यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांच्या मजबुतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून सीसी रस्त्यांचे बांधकाम सुरू केले होते. मात्र ठेकेदार आणि बिल्डर यांच्या निष्काळजीपणामुळे हा निधी वाया जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या अभियंते आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “सार्वजनिक निधीतून बांधलेले रस्ते काही दिवसांतच खचत असतील तर याला जबाबदार कोण? बिल्डर की प्रशासन?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय, “एकीकडे रस्ते खचत आहेत आणि दुसरीकडे याचे कोणीही उत्तरदायी नाही,” असेही नागरिकांनी सांगितले.
या दुर्घटनेनंतर मनसे आणि शिवसेना या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी पालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.
मनसे शहराध्यक्षांनी सांगितले, “मनपा आयुक्तांची कार्यपद्धती पूर्णपणे फोल झाली आहे. दोन मोठ्या पक्षांच्या दबावात आयुक्तांची कुचंबणा होतअसून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. नागरिकांचा जीव धोक्यात लावणाऱ्या अशा हलगर्जी कारभाराला माफी नाही.”शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले,“पालिकेतील अभियंते आणि अधिकारी बांधकामांची गुणवत्ता तपासत नाहीत. RNA बिल्डरच्या गैरजबाबदार वागणुकीमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर परिणाम होत आहे. आम्ही याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून याची चौकशी व कारवाईची मागणी करू.”
सीसीटीव्ही फुटेजमधून या घटनेचा संपूर्ण तपशील समोर आल्यामुळे पालिका आणि बिल्डर दोघांची जबाबदारी टाळता येणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत असून शहरभर तीव्र चर्चेला कारण ठरत आहे. त्याचबरोबर शहर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. दुर्घटनेनंतरही पालिकेच्या वतीने कोणतीही ठोस भूमिका अथवा कारवाईची घोषणा करण्यात आलेली नाही. ही दुर्घटना पुढील काळात आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.संपूर्ण घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.संबंधित अधिकाऱ्यांवर आणि RNA बिल्डरवर फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करून याला चाप लावावा, अशी मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांकडून होत आहे.