ठाणे : २९ जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा सण उत्सव आणि व्रतवैकल्यांनी संपन्न असून या काळात फळांना (Fruits) ग्राहकांची वाढती मागणी असते. परंतु श्रावण महिन्यातील वाढत्या मागणीमुळे आता भाज्यांपाठोपाठ (Vegetable) फळे देखील आता २० टक्क्यांनी महागली आहेत. यामुळे ऐन श्रावणात गृहिणींचे बजेटला महागाईची झळ बसणार असून घरखर्चावर देखील याचा अधिक भार पडणार आहे.
श्रावण महिन्यात उपवासामुळे (Fasting) अनेकजण भाज्या आणि फळांवर अवलंबून असतात. त्यामुळे भाज्यांसह फळांनाही अधिक मागणी असते. यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या जोरदार पावसामुळे भाज्यांची बाजारपेठेतील आवक घटून तसेच भाजीपाला खराब जाळ्याने भाज्या ह्या १५ ते २० टक्क्यांनी महागल्या आहेत. त्यापाठोपाठच आता वाहतूक खर्च तसेच वाढती मागणी यामुळे श्रावणात फळें देखिल २० टक्क्यांनी महागली असल्याचे ठाणे शहरातील फळ विक्रेत्यांनी सांगितले.
ठाण्यासह मुंबई (Mumbai- Thane)उपनगरांमधील बाजारपेठेत जळगाव, भुसावळ तसेच गुजरात येथून केळ्याची आवक होत असते. तर काश्मीर सह न्यूझीलंड सारख्या देशातूनही सफरचंद आणि लाल द्राक्षांची आयात होत असते. मात्र सध्या ती काहीशी आंबट असल्याने त्याची खरेदी मोठयाप्रमाणात होत नाही. याशिवाय पेरू, मोसंबी, हिरवी द्राक्षे, संत्री, चिकू, या फळांचा सध्या सीझन नसल्यामुळे त्याची आवक महाराष्ट्रातून होत नाही. पेरूचा सीजन नसल्याने ते परराज्यातून येत असून सीताफळाची आवक सासवड येथून होत आहे. श्रावणात वृतवैकल्यांमुळे फळ खरेदीकडे सर्व ग्राहकांचा ओढा असतो. तेव्हा मागणीत वाढ झाल्यामुळे फळांचे भाव वाढले असून श्रावण संपताच फळांचे भाव पुन्हा स्थिर होतील असे मत फळ विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे.
मागणीत वाढ झालयामुळे फळांच्या किमती वाढलेल्या आहेत.
फळांच्या किंमती
केळी ६० रुपये (प्रति डझन)
इलायची केली ८० रुपये (प्रति डझन)
सफरचंद २०० रुपये (प्रति किलो)
पपई ८० रुपये (प्रति किलो)
पेर १६० रुपये (प्रति किलो)
पेरू १५० रुपये (प्रति किलो)
सीताफळ २०० रुपये (प्रति किलो)
लाल द्राक्ष ५०० रुपये (प्रति किलो)
श्रावण महिना सुरु असल्याने फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे फळांच्या किंमती ह्या २० टक्क्यांपर्यंत महागल्या आहेत, असे धीरज गुप्ता (फळविक्रेता ) याने सांगितले.