फोटो सौजन्य: गुगल
ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे: पावसाळा तोंडावर आला आहे मात्र अजूनही शहरात पाहिजे तशी नालेसफाई झालेली दिसत नाही अशी खंत काही दिवसांपासून नागरिक करत होते. अशातच आता या प्रकरणात शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी पालिका अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. पावसळ्याआधी नालेसफाई होणं गरजेचं आहे मात्र असं असूनही पालिकेचे कर्मचारी हलर्जीपणा करताना दिसत आहेत अशी सडकून टीका राजन विचारे यांनी केली आहे.
31 मे ची डेडलाईनला काही दिवस बाकी असून कामे अजुन अर्धवट दिसत आहेत. त्यातच अर्धे ठाणे खोदून ठेवले असून तलावांची झालेली दुरावस्था, कचऱ्याच्या समस्या, नालेसफाई समस्या, घोडबंदर पट्ट्यात अपूर्ण असलेल्या कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे तुंबले तर याला प्रशासन जबाबदार असल्याचे टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचार यांनी केला आहे. ठाणे महापालिकेच्या सूरू आसलेल्या बेबंद कारभारावर राजन विचारे ठाणे महापालिका आयुक्तांवर चांगलेच घसरले.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात शिवसेना नेते राजन विचारे यांनी आयोजित केलेली बैठक
काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदर बैठकीत तलावांचे शहर ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरांतील तलावांची झालेली दुरावस्थेसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांची पोलखोल करण्यात आली.
एखादा लोकप्रतिनिधी वारंवार पत्र देऊन जर त्या पत्रांची कोणाच्या सांगण्यावरून दाखल घेत नसतील तर सर्व सामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल विचारे यांनी उपस्थित केला. सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासन कारभार संभाळत आहे. आपल्याला वाटेल तसे काम अधिकारी करत आहेत. तसेच सत्तेत असणाऱ्या शिंदे गटाच्या मनमानी कारभारामुळे प्रशासनावर कोणाचे अंकुश राहिले नाही.
गेल्या सहा महिन्यापासून ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेल्या दुरवस्थेबाबत वारंवार पत्र देऊन गाळ काढण्याची मागणी करत होते. याचा नियोजित आराखडा ही मंजूर करून निधी अभावी काम थांबवून याकडे गांभीर्याने दुर्लक्ष करून आवडत्या ठेकेदारांची बिले काढण्यात अधिकारी व्यस्त आहेत. या त्यांच्या निष्काळजीपणामुळे तलावातील वारंवार मासे मरत आहे . सिद्धेश्वर तलाव , ब्रम्हाळा तलाव, मदार्डे तलाव मासे मरायला अधिकारी जबाबदार आहेत. पावसाळा लक्षात घेऊन गाळ न काढल्याने जर या तलावातील पाणी शेजारील झोपडपट्ट्यांच्या घरात घुसले तर याला त्या अधिकाऱ्याला धरून त्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे
पावसाला तोंडावर आला असताना शहरातील नालेसफाई 45% झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला. उर्वरित 55% नालेसफाई कधी पूर्ण करणार असा सवाल विचारे यांनी केला. साफसफाई करणाऱ्या ठेकेदार वरवरचा कचरा उचलून गाळ तसाच खाली ठेवतात. मोठा पाऊस आला की सर्व कचरा पावसाच्या वेगाने पुढे ढकलला जातो याची वाट पाहत असतात त्यामुळे त्यांचे काम हलके होते हे अधिकाऱ्यांना दिसत नाही का? असा देखील विचारे यांनी उपस्थित केला आहे.
घोडबंदर पट्ट्यात अनेक ठिकाणी एमएमआरडीए अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. यांची मुदत ३१ मे पर्यंत पुर्ण होतील असे आयुक्तांनी सांगितले. कामे पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व यंत्रणेची आहे. घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोड खोदून ठेवले आहेत. त्याची कामे बाकी आहेत. यंदा घोडबंदर पाण्याखाली जाणार अशी भीती विचारे यांनी व्यक्त केली. पाणी तुंबले तर त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी ही पत्राद्वारे केली आहे.