ठाणे स्नेहा जाधव,काकडे : आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने ठाणे मनपाचा स्त्युत्य उपक्रम पाहायला मिळत आहे. आज सकाळी स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छता विषयक जागृती करणाऱ्या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यावेळी स्वच्छतेविषयी शपथ घेण्यात आली.
जैवविविधता दिनाच्या निमित्ताने स्वच्छतेचं महत्त्व नागरिकांना समजावं यासाठी मनपाने हा उपक्रम राबविण्याची योजना हाती घेतली आहे. आज सकाळी सात वाजता कोपरी येथील अष्टविनायक चौक, चेंदणी कोळीवाडा, स्वामी समर्थ मठ या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेची सुरूवात जनजागृती करणाऱ्या रॅलीने झाली. या रॅलीत स्थानिक नागरिक, स्वच्छता कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर, वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, ऑरनॅट या संस्थेच्या कलाकारांनी स्वच्छतेविषयी जागृती करणारे पथनाट्य सादर केले. या मोहिमेत, ठाणे पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक समूह, स्वराज महिला मंडळ, स्वराज सामाजिक संस्था, स्वामी समर्थ मठ सेवेकरी, योग ग्रुप, मीठबंदर रोड, चेंदणी कोळीवाडा कोळी समाज, आर्ट ऑफ लिव्हिंग- इको क्रांती, मनोहर चव्हाण, स्वप्नील कोळी, अरुण राजगुरू आदी सहभागी झाले.
त्याचबरोबर, याप्रसंगी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्यांच्यासह, मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया आणि शंभूराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर आणि सुनील जगताप, अजय जगताप, संजू रणदिवे आदी सहभागी झाले होते.तसेच, महापालिका मुख्यालय येथे दुपारी 12.30 वाजता महापालिका कर्मचाऱ्यांसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. त्यावेळीही स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
या निमित्ताने, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ठाणे रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्यांच्या मुलाखतीही घेण्यात येत आहेत. गुरूवारी त्या मालिकेचा आरंभ हिरवं स्वप्नं या संस्थेचे संस्थापक अनिल वाघ आणि प्रभा राव यांची पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या मुलाखतीने झाला. ही मुलाखत ठाणे रेडिओवर प्रसारित करण्यात आली.
एकीकडे स्वच्छता मोहिम हाती राबविली जात आहे आणि दुसरीकडे मात्र कळवा पूर्व येथे नालेसफाई कामाचे तीन तेरा नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसल्या बाबत ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी पालिकेला खडेबोल सुनावले आहेत. राहुल पिंगळे यांनी सांगितलं की, आम्ही सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत.परंतु तरीसुद्धा परिस्थिती जैसे थे आहे.अनेक ठिकाणी नाले योग्य पद्धतीने साफ केलेले नाहीत.गाळ काढला तर त्याच्यावर जंतुनाशकांची फवारणी केली जात नाही.नाल्यातून काढलेला गाळ दहा दहा दिवस तसाच त्या ठिकाणी पडून राहतो.त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय तसेच आरोग्याचा गंभीर प्रश्न देखील निर्माण होत आहे.अधिकाऱ्यांनी नुसते पाहणी दौरे करत नालेसफाईबाबत आश्वासने देण्यापेक्षा रस्त्यावर उतरवून त्या ठिकाणी स्वतःहा उभे राहून विहित मुदतीत नालेसफाईची कामे करून घ्यावीत.जेणेकरुन थोड्या पावसात पूरपरिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना त्रास होणार नाही.नालेसफाईच्या कामात सातत्याने हातसफाई होत आहे.त्यामुळे आतातरी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्या नाहीतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नागरी हितासाठी आम्हाला कठोर आंदोलनात्मक भूमिका लागेल असा इशारा ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे.