ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे : महापालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना फसली असल्याचं दिसून येत आहे. शहरात लाखो रुपयांत कृत्रिम विसर्जन तलाव उभारले गेले; मात्र भाविकांनी त्याकडे पाठ फिरवली असल्याचं दिसत आहे. कृत्रिम तलावात विसर्जनाला प्राधान्य देत पर्यावरण संरक्षणासाठी एक पाऊल पुढे या असं म्हणत पालिकेने आवाहन देखील केले होते. कृत्रिम तलावांचं सर्व नियोजन देखील करण्यात आलं होतं. मात्र असं असून देखील अनेकांनी थेट गणेश मूर्तीचं खाडीतच विसर्जन केले. परिणामी कोट्यवधींच्या निधीचा अपव्यय झाला आणि खाड्यांचे प्रदूषण वाढले. त्यामुळे महापालिकेच्या मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ठाणे महापालिकेच्या वरवरच्या पर्यावरण उपक्रमांमुळे केवळ फोटोसेशन होत असले, तरी देखील POP सारख्या घातक मूर्ती पाण्यात मिसळून जैवविविधता उद्ध्वस्त करत आहेत. या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका स्थानिक कोळी समाजाला बसत आहे. एकेकाळी मासेमारीतून उदर्निवाह करणारे कोळी आता पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या जिवनावर या विसर्जनामुळे गंडांतर येत असल्याची खंत देखील या समाजाने व्यक्त केली आहे.
याबाबत पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत रविंद्र सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट स्मरणपत्र पाठवले आहे. यात त्यांनी कृत्रिम तलाव उपक्रमाचे अपयश अधोरेखित करताना म्हटले आहे की “सार्वजनिक निधीचा अपव्यय थांबवून प्रत्यक्षात परिणामकारक उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. फक्त पत्रकं, जाहिराती आणि ढोलताशा यावर पैसे उधळून जनतेची दिशाभूल करणं बंद झालं पाहिजे. खाड्यांत विसर्जन रोखण्यासाठी कठोर कायदे, जनजागृती आणि व्यवहार्य उपाय हवेत. अन्यथा पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही केवळ कागदी घोषणा राहील.”
आज डॉ. प्रशांत रविंद्र सिनकर यांनी त्यांच्या स्मरणपत्रात स्पष्ट मागणी केली आहे की :
१) कृत्रिम विसर्जन तलाव उपक्रमाच्या अपयशाचा तातडीने आढावा घ्यावा.
२) POP आणि रासायनिक रंगांच्या मूर्तींचं विसर्जन खाड्यांत थांबविण्यासाठी कठोर कारवाई करावी.
३) खरोखर व्यवहार्य आणि परिणामकारक पर्यावरणपूरक विसर्जन पद्धती अंमलात आणाव्यात.
“भाविकांच्या श्रद्धेला धक्का न लावता, पर्यावरण आणि खाडी वाचवण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडली पाहिजे. अन्यथा ठाणेकरांचा विश्वास उडेल आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही घोषणा लोकांच्या थट्टेचा विषय बनेल, असं पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत रविंद्र सिनकर यांनी सांगितलं आहे.